Thursday, April 25, 2024
Homeजळगावहळद रुसली - वर्‍हाडी मंडळी फसली !

हळद रुसली – वर्‍हाडी मंडळी फसली !

बोदवड – प्रतिनिधी :

बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथे लग्नाच्या नव्हे तर चक्क हळदीच्या कार्यक्रमात तब्बल दीडशे वर्‍हाडी मंडळी गोळा झाल्याची माहिती मिळताच

- Advertisement -

तहसीलदार प्रथमेश घोलप, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी करोना कायद्याचा दंडुका दाखवून गुन्हा दाखल केला.

लग्नाआधीच हळद रुसली आणि वर्‍हाडी मंडळी कायद्याच्या कचाट्यात फसल्याने तालुक्यात या विषयाची चर्चा चांगलीच रंगली होती.

महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने 1 मेपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

यात अत्यावश्यक सेवेतील दुकानं वगळता सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. या काळात लग्नसोहळ्यांसाठीही 25 माणसं आणि दोन तासांत सोहळा आटोपण्याचे बंधन राज्य सरकारने घालून दिलंय.

परंतु, बोदवड तालुक्यातील मुक्तळ या गावात सर्व नियमांचा भंग करुन लग्नसोहळ्यात नव्हे तर चक्क हळदीच्या कार्यक्रमात गर्दी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

तहसीलदार व पोलीस अधिकार्‍यांनी हळदीच्या मंडपात धडक कारवाई करत नियमांचा भंग केल्याप्रकरणी सरपंच आणि आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.

मुक्तळ येथील एका कुटुंबात 28 रोजी हळदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. 29 रोजी हे लग्न मलकापूर तालुक्यात लागायला जाणार होते.

मात्र, लग्नाआधीच या कार्यक्रमामध्ये 100 ते 150 वर्‍हाडींची उपस्थिती होती. यावेळी अनेकांनी अधिकारी व पथक कारवाईला आल्यानंतर मास्क घातला.

राज्य शासनाने जमावबंदी कायद्याचे पालन करण्याचे आदेश दिलेले असतानाही असा प्रकार घडून आल्याने कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी गावातील जितेंद्र रमेश पाटील, विशाल विलास साबळे, तुषार विलास साबळे आणि सरपंच सौ. पल्लवी जितेंद्र पाटील यांच्याविरुद्ध पोलीस पाटील युवराज पाटील यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल भगवान कोळी करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या