Wednesday, May 8, 2024
Homeनगरयंदा 48 महसूल मंडळात अतिवृष्टी

यंदा 48 महसूल मंडळात अतिवृष्टी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यंदा जिल्ह्यात पावसाने कहरच केला असून जून ते सप्टेंबरअखेर सरासरीच्या तुलनेत 497.2 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारी 122 टक्के आहे. यात जिल्ह्यातील 3 मंडलात तीन वेळा अतिवृष्टी झालेली असून 13 मंडळात दोनदा तर 32 महसूल मंडलात एकदा अतिवृष्टी नोंदवली गेली आहे. जिल्ह्यात एकूण 48 महसूल मंडळात 67 वेळा अतिवृष्टी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या अहवालातून हाती आली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात यंदा विक्रमी पावसाची नोंदण झाली असून जामखेड आणि पाथर्डी तालुक्यातील पावसाची सरासरीची टक्केवारी ही 100 टक्क्यांच्या आत आहे. उर्वरित सर्व तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिकचा पाऊस नोंदवला गेला आहे. सर्वाधिक पाऊस 748.4 मि.मी (179.3 टक्के) अकोले तालुक्यात झाला असून त्यानंतर संगमनेरमध्ये 447.5 मि.मी. (147.5 टक्के) झालेला आहे.

अतिवृष्टीचा विचार केल्यास नगर, श्रीगोंदा आणि राहाता तालुक्यातील मंडळात तीन वेळा अतिवृष्टी झालेली असून नगर, पारनेर, कर्जत, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूरमध्ये प्रत्येकी 1 तर कर्जत आणि राहाता तालुक्यातील प्रत्येकी दोन मंडळात आणि अकोले तालुक्यातील तीन मंडळात दोन अतिवृष्टी झालेली आहे. नगर तालुका आणि राहुरी तालुक्यातील प्रत्येकी 3 मंडलात, पारनेर, शेवगाव, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर आणि श्रीगोंदा या तालुक्यातील प्रत्येकी 4 मंडलात तर कर्जत, पाथर्डी आणि नेवासा तालुक्यातील प्रत्येकी 2 मंडलात एकदा अतिवृष्टी झालेली आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात 48 मंडळात 67 ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे.

जून ते ऑगस्ट या कालावधीत जादाच्या पावसामुळे 172 गावात 21 हजार 410 शेतकर्‍यांच्या 1 हजार 319 हेक्टवरील पिकांचे नुकसान आलेले असून नुकसानीचा आकडा हा 4 कोटी 25 लाखांचा आहे. यापैकी 2 कोटी 91 लाखांचे अनुदान मिळालेले असून त्याचे वाटप झालेले आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून आतापर्यंत 609 गावात 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची प्राथमिक माहितीमध्ये 61 हजार 624 शेतकर्‍यांचे 51 हजार 572 हेक्टवरील पिकांचे नुकसान झालेले आहे.

असे आहे नुकसान

नगर तालुक्यातील एका गावात सततच्या पावसामुळे आंबा, लिंबू पिकाचे नुकसान झालेले आहे. पारनेर तालुक्यातील 10 गावात सततचा पाऊस आणि ढगफुटीसदृष्य पावसामुळे सोयाबीन, बाजारी, भाजीपाला आणि चारपिकांचे नुकसान, श्रीरामपूर तालुक्यातील 5 गावात सततचा पाऊस आणि पूरामुळे सोयाबीन, मका आणि कापूस, राहुरी तालुक्यातील 96 गावात सोयाबीन, कापूस, बाजारी आणि फळपिकांचे, नेवासा तालुक्यातील 2 गावे वादळीवारे व पाऊस तर 18 गावात अतिवृष्टीमुळे केळी, सोयाबीन, कापूस, मका, तूर आणि बाजरी पिकांचे, संगमनेर तालुक्यातील 11 गावात बाजरी, मका, सोयाबीन, चारा पिके, भूईमूग, गवार आणि कापूस पिकांचे, अकोले तालुक्यातील 315 गावात सोयाबीन, भाजीपाला, फुलपिके, भूईमूग, भात आणि अन्य पिकांचे, कोपरगाव तालुक्यातील 36 गावात अतिवृष्टी आणि 79 गावात सततच्या पावसामुळे सोयाबीन, मका, बाजारी, कपाशी आणि डाळींब या पिकांचे, राहाता तालुक्यात 36 गावात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, गुलाब, कापूस, कांदा आणि वांगी पिकाचे, तर सप्टेंबर महिन्यांत अकोले तालुक्यातील 11 गावात अतिवृष्टीमुळे 421 शेतकर्‍यांच्या 63.39 हेक्टरवर गाळ साचून शेतीचे नुकसान झाले आहे. तर पारनेर तालुक्यात 6 गावात 34 शेतकर्‍यांच्या शेत जमीनीचे 2.20 हेक्टरवर पाण्यामुळे नुकसान झालेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या