Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगप्रेमाला उपमा नाही!

प्रेमाला उपमा नाही!

‘मी मधूर पाटील. तुमच्या सगळ्यांचा मध्या. हुशार पण गरीब होतो पण नशीब आपल्या हातात असतं. ठरवलं तर काहीही अशक्य नाही. असं ठाम मत असणारा मी आज मुंबईत एका सॉफ्टवेअर कंपनीचा मालक आहे. सुदैवाने जिच्याशी प्रेम केलं ती मधुराच अर्धांगिनी झाली. त्यामुळे जीवनप्रवास सुखमय झालाय.’

अगदी ओजसपणे मधूर मैत्रसोहळ्यात आपला जीवनप्रवास कथित करत होता. याचा मधुराशीच विवाह झाला होता हे त्याच्या भाषणातून एव्हाना कळले होते. कारण मधूर-मधुराचं प्रेम आम्हा सगळ्यांनाच माहीत होतं. एक अबोल प्रेम होतं दोघांत. एकमेकांची काळजी घ्यायचे. मधुरा तिची पुस्तके, नोट्स त्याला द्यायची. काही अडचण आली तर आर्थिक हातभार लावायची. अगदी जीवश्च-कंठश्च मैत्री होती दोघांची. त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं, पण ते अबोलच राहीलं. इथपर्यंतच मला ठाऊक होतं. नंतर प्रत्येकाचा प्रवास बदलला, मार्ग बदलले. त्यामुळे काही कळलंच नाही. आज मैत्रसोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आठवणींना उजाळा मिळाला आणि प्रत्येक वर्गमित्राची नव्याने ओळख होऊ लागली.

- Advertisement -

बर्‍याच वेळाने मधूर फोनवर बोलत-बोलत थोडा लांब गेलेला पाहून मी त्याच्याकडे गेले. त्याचं बोलणं झाल्यावर त्याला म्हणाले, ‘’मधूर, अरे मधुराला का नाही आणलं? बारावीनंतर आमची भेटही झाली नाही अन् बोलणंही… आज आली असती तर बोललो असतो, भेटलो असतो…’ अगदी उदास चेहरा करून मधूर बोलू लागला, ’अगं ती येण्याच्या परिस्थितीत नाही, झोपून असते.

‘म्हणजे?’

कार्यर्कम झाला की भेटू आपण आणि निवांत बोलू. आता सविस्तर नाही सांगता यायचं’

‘ठिक आहे.‘ असं म्हणून आम्ही दोघे कार्यक्रमाच्या दिशेने चालू लागलो. मधूर शांतच होता.

कार्यक्रम झाला अन् मी पटकन मधूरकडे गेले. दोघे शाळेच्या प्रांगणात असणार्‍या बागेत गेलो, एका झाडाखाली बसलो. सगळं कसं शांत होतं, तेवढ्यात मधूरचा आवाज आला, ‘प्रिया, मधुराचं माझ्यावर निस्सीम प्रेम. अगदी इंजिनिअरिंगलाही आम्ही बरोबरच, पण प्रेम कधी व्यक्त केलंच नाही तिनं. कारण आपलं प्रेम हे करिअरच्या मध्ये येईल असं वाटायचं तिला. त्यात मी गरीब. शिक्षणाचा खर्च न पेलवता येणारा. तरी आई लोकांची धुणीभांडी करून खर्च भागवते हेही तिला माहीत होतं. एकदा मी तिला विचारलं तर म्हणाली, इंजिनिअर होऊन दाखव. मग तुझ्याशीच लग्न करेन! मग काय… उत्साह संचारला अंगात. दटून अभ्यास केला. टॉपर बनलो. मधुराच्या प्रेमानं मला प्रेरणा मिळाली. तिनेही चांगलं यश मिळवलं. पण कदाचित तिच्या घरच्यांना आम्हा दोघांचा विवाह मान्य नव्हता. माझी गरिबी आडवी आली, पण मधुरा सगळं सोडून माझ्याकडे आली. दोघांनी लग्न केलं. माझ्या आईनं स्वीकारलं, पण तीही आम्हाला सोडून निघून गेली कायमची. खूप रडलो आम्ही. मधुरा तर अगदी पोरकं झाल्यासारखं वाटलं. ना आई-वडिलांची साथ, ना आता सासरचा आधार… खूप उदास राहायची ती. आमच्या लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी तिला अर्धांगवायूचा झटका आला. तेव्हापासून अंथरुणाशी तिचं नातं जोडलं कायमचंच! ती ना उठू शकत, ना बोलू शकत. सगळं जागेवरच. खूप प्रयत्न करतोय, पण अजून यश नाही. वीस वर्षे होऊन गेली माझी मधुरा अंथरुणावरच आहे. पण तिने हिंमत हरली नाही. कारण तिला माहीत आहे की ती माझी प्रेरणा आहे. माझा श्वास आहे.’

‘तुला दुसरं लग्न करावं नाही वाटलं?’ न राहून मी विचारल्यावर तो पटकन म्हणाला, ‘प्रिया, मधुरा आई-वडील, श्रीमंती सगळं काही सोडून आली. फक्त माझ्यावरील प्रेमामुळे, फक्त माझ्यासाठी! आज तिच्या जागेवर मी असतो ना तर तिने अहोरात्र जागून माझी सेवा केली असती. माझा त्रागा कधीच केला नसता. तिच्या मधूर वाणीने मला प्रेरणाच दिली असती. म्हणून मीही फक्त तिच्यासाठीच जगणार. कारण प्रेम म्हणजे हातात हात घेऊन नुसतं फिरणं नव्हे. प्रेम म्हणजे एक जाणीव आहे मनाची. एक तहान आहे अतृप्त भावनांची. प्रेम म्हणजे दोन आत्म्याचं मिलन असतं. ते जेवढं सोपं तेवढंच विशाल! अगदी त्यात हे सर्व विश्व सामावलेलं असतं.’

मधूरचं बोलणं ऐकून निःशब्द झाले. काय बोलावं हेच कळेना. खूप अभिमान वाटला त्याचा. प्रेमाची नवी व्याख्या त्याच्या बोलण्यातून उमटत होती. आजच्या तरुण-तरुणींच्या बेगडी प्रेमाला लाजवेल असं प्रेम होतं त्याचं. निःस्वार्थी अन् निरागस! मधूरला निरोप देताना माझ्या तोंडून एकच उद्गार आपसूक निघालं, ‘मधूर, खरंच तुमच्या प्रेमाला उपमा नाही…’

(ही कथा काल्पनिक असून पात्र, परिस्थिती साधर्म्य केवळ योगायोग समजावा.)

– मनीषा दहातोंडे-लबडे, 9422858514

- Advertisment -

ताज्या बातम्या