Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसोलर बोअरवेलद्वारे भागविली जातेय काळवीट, हरणांची तृष्णा

सोलर बोअरवेलद्वारे भागविली जातेय काळवीट, हरणांची तृष्णा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येवला तालुक्यातील (Yeola taluka) राजापूर-ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्रात (Rajapur-Mamdapur reserved forestry area) काळवीट (Blackbuck) व हरणांचा (Deer) पाण्याचा प्रश्‍न कायम उद्भवत असतो…

- Advertisement -

या राखीव वनसंवर्धन क्षेत्रावर सोलर बोअरवेलद्वारे (Solar borewell) काळवीटांसह हरिणांची तृष्णा भागविली जात आहे. यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारली आहे. असे असले तरी येवला तालुक्यात प्रारंभी पाऊस झाल्याने पाणवठे भरल्याने वन्यजीवांसाठी आधारच झाला आहे.

येवला वनपरिक्षेत्रात राजापूर-ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्र येते. ममदापूर, रहाडी, रेंडाळे, कुसमाडी, जायदरे, धोणेगाव या ठिकाणी सोलर बोअरवेलची व्यवस्था करण्यात आली आहे. बटण लावून पाणवठ्यामध्ये पाणी भरले जाते. राजापूर-ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्रे साडे पाच हजार हेक्टरपर्यंत पसरले आहे. येथे मोठ्या संख्येने हरिण व काळविटांचा राबता दिसून येतो.

पाण्यासाठी वन्यजीवांना भटकंती करावी लागते. अनेकदा रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत हरणांचा मृत्यू होतो. तर लांडगे व कुत्र्यांच्या हल्यात काळवीट व हरणांचा मृत्यू झाल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.

पाण्यासाठी होणारी भटकंती पाहून पाच ठिकाणी राखीव क्षेत्रात सोलर बोअरींगची व्यवस्था केली आहे. वन्यजीवांना सहज पिण्यासाठी पाणी मिळावे याकरिता सोलर बोअरवेलचा उपयोग केला जात आहे. तर तालुक्यात झालेल्या पावसाने पाणवठे भरल्याने पाण्याचा प्रश्‍न मिटल्याचे वन विभागाने म्हटले आहे.

काळवीट, हरणांची संख्या साडे पाच हजारांवर

राजापूर-ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्रामध्ये तब्बल साडे पाच हजारांपर्यत काळवीट व हरणांची संख्या आहे. तीन वर्षांपूर्वी केलेल्या प्राणी गणनेतून ही माहिती समोर आली होती. साधारणत: पाच ते सात वर्षांनी ही गणना केली जाते. या राखीव क्षेत्रात लांडगे, तरस, साळ या वन्यजीवांचाही संचार आढळून येतो.

येवला वनक्षेत्राचा कार्यभार अतिरिक्तच्या हाती

राज्यात सर्वाधिक काळवीट राजापूर-ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्रामध्ये आढळून येतात. त्यामुळे हे क्षेत्र संवेदनशील व महत्वाचे आहे. असे असतानाही येवला वनक्षेत्रासाठी पूर्णवेळ वनपरीक्षेत्र अधिकारी मिळ्त नसल्याचे चित्र आहे. प्रभारीच्या हाती येथील कारभार दिला आहे.

संजय भंडारी या पदावरुन सहा महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर हे पद रिक्तच असून मोबाइल स्कॉड सांभाळणारे बशीर शेख यांच्याकडे या पदाचा अतिरीक्त पदभार आहे. मात्र याठिकाणी पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची गरज असून तात्काळ पूर्णवेळ आरएफओची नियुक्त करण्याची मागणी केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या