Thursday, April 25, 2024
Homeनगरगारपिटग्रस्त शेती पिकांना 25 हजार तर फळबागांना 50 हजारांची भरपाई द्या

गारपिटग्रस्त शेती पिकांना 25 हजार तर फळबागांना 50 हजारांची भरपाई द्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या गारपिटीमुळे अनेक गावांत शेतकर्‍यांचे शेती पिके आणि फळबागाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

- Advertisement -

यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाने तातडीने शेती पिकांना प्रत्येकी 25 हजार तर फळबागांना 50 हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा येत्या आठ दिवसांनंतर रास्तारोको करण्याचा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

आधी करोना, मग ओला दुष्काळ आणि आता गारपिट यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. गारपिटीमुळे गहू, हरभरा, कांदे, मका, ऊस, टरबूज, खरबूज, तसेच आंबा, संत्री, द्राक्षे, मोसंबी या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना या आसमानी हानीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी तातडीने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत मिळणे गरजेचे आहे. मागील वर्षीच्या गारपिटीतील नुकसान भरपाई अद्याप शेतकर्‍याच्या पदरात पडलेली नाही.

त्या भरपाईसह आताची नुकसान भरपाई लवकर देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी केली आहे. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, प्रसाद ढोकरीकर, कचरू चोथे, बाळासाहेब महाडिक, दिलीप भालसिंग, आजिनाथ हजारे, शामराव पिंपळे आदी उपस्थित होते.

यावेळी कर्डिले म्हणाले, राज्यात अवकाळी पाऊस होऊन तीन चार दिवस झाले तरी सरकारने पंचनामे करण्याचे कोणतेही आदेश दिले नाहीत. सरकारचे सर्व लक्ष संजय राठोड, अनिल देशमुख, वाजे प्रकारणात आहे.

राज्य सरकारच्या दिल्लीपासून ते मुबईपर्यंत बैठकांचे सत्र सुरू आहे. शेतकर्‍यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. यामुळे येत्या आठ दिवसांत शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करावी, अन्यथा भाजपच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष मुंढे यांनी यावेळी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या