Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशभाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक

भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक

दिल्ली | Delhi

सध्या पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर असलेले भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP national President JP Nadda) यांच्या ताफ्यावर आज दगडफेक झाली आहे. जे पी नड्डा यांच्यासोबत भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) देखील होते.दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले असता ताफ्यातील गाड्यांवर हल्ला करण्यात आला.

- Advertisement -

कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावरही हल्ला करण्यात आला असून दगडफेक करण्यात आली आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी कारमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांचा ताफा जात असताना रस्त्यावर निषेध करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होत असल्याचं दिसत आहे. तसंच दगडफेक करत गाडीच्या काचाही फोडल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये गाडीमध्ये आलेला दगडही त्यांनी दाखवला आहे. “बंगाल पोलिसांना जे पी नड्डा यांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती. पण पुन्हा एकदा बंगाल पोलीस अपयशी ठरली. पोलिसांसमोर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि माझ्या गाडीवर दगडफेक केली,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हल्ल्यावर जे पी नड्डा यांनी सभेत बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली असून म्हटलं आहे की, “आज झालेल्या हल्ल्यात मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाले आहेत. लोकशाहीसाठी ही लज्जास्पद घटना आहे. ताफ्यात हल्ला झाला नाही अशी कोणतीही कार नाही. मी बुलेटप्रूफ कारमध्ये होतो म्हणून सुरक्षित आहेत. पश्चिम बंगालमधील अराजकता आणि असहिष्णुता संपवावी लागेल”. “जर मी आज या बैठकीत पोहोचलो आहे तर ते देवी दुर्गाच्या आशीर्वादानेच,” असंही यावेळी ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंबंधी अहवाल मागवला आहे. तसेच, अमित शाह यांनी ममता बॅनर्जी सरकारला इशाराही दिला आहे. “आज बंगालमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर हल्ला झाला ही खूपच निंदनीय घटना आहे. या घटनेचा कितीही निषेध करावा तरी कमीच आहे. केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या राजकीय पुरस्कृत हिंसेच्या घटनेबाबत बंगालच्या सरकारला आता शांतताप्रिय जनतेला उत्तर द्यावंच लागेल”, असं ट्विट अमित शाह यांनी केलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या