Friday, April 26, 2024
Homeराजकीयरावसाहेब दानवेंचे शेतकऱ्यांबाबतचे विधान पोरकटपणाचे

रावसाहेब दानवेंचे शेतकऱ्यांबाबतचे विधान पोरकटपणाचे

मुंबई | Mumbai

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन आता व्यापक स्वरूप प्राप्त करताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी, या आंदोलनामागे विरोधकांचा हात असल्याचे अनेकदा आरोप केले आहेत. परंतु, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मात्र या आंदोलनाबाबत एक वादग्रस्त विधान केलं. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दानवेंवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

रावसाहेब दानवे हे केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत, त्यांची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची आहे. असे असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले विधान हे अतिशय पोरकट असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. तसेच दानवे यांचे विधान तथ्यहीन असून केवळ लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न असावा, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

तसेच, केंद्र सरकारने आणलेले नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. या कायद्यांना देशातील असंख्य शेतकऱ्यांकडून विरोध दर्शवला जात आहे. हे कृषी कायदे रद्द व्हावेत ही संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे केंद्र सकरकारने आपली हटवादी भूमिका सोडून सामंजस्याची भूमिका घ्यावी, आम्ही म्हणू ती पूर्व दिशा हे धोरण लोकशाहीत चालत नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी केलेय. हे विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्याचे असते तर शेतकरी रस्त्यावर आलाच नसता, असेही अजित पवार म्हणाले.

करोनाची लस आल्यावर लसीकरणाबाबत राज्य सरकारची तयारी योग्यपद्धतीनं सुरु आहे. आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांसोबत लष्करी जवानांनाही सर्वात आधी लस देण्याबाबत प्रयत्न केला जाईल, असं अजित पवार म्हणाले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये योग्य समन्वय राखला जात आहे. ५० वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना आधी लस दिली जाईल, अशी शक्यताही अजितपवार यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर सडकून टीका केली. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच, त्यांना घरात घुसून फटकवायला हवं असंही कडू म्हणाले. “गेल्या वेळी जेव्हा रावसाहेब दानवे यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं, तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. पण आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आता तर रावसाहेब दानवेंच्या घरात घुसून त्यांना चोपलं पाहिजे”, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.

काय म्हणाले होते दानवे?

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथे आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा काल (बुधवार, 9 डिसेंबर 2020) पार पडला. या सोहळ्याला रावसाहेब दानवे हजर होते. या वेळी बोलताना देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना रावसाहेब दानवे यांनी खळबळजनक विधान केले. रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनाचा संबंध थेट चीन व पाकिस्तानशी जोडून नवा वाद ओढवून घेतला आहे. ‘हे शेतकऱ्यांचं आंदोलन नसून या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. पहिल्यांदाच देशातील मुस्लिम समाजाला भरकटवलं आणि सीएए आणि एनसीआरमुळं मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल, असं सांगितलं. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?’ असा सवाल दानवेंनी यावेळा केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या