Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याधाडीवरून लक्ष विचलित करण्यासाठी बंद

धाडीवरून लक्ष विचलित करण्यासाठी बंद

मुंबई / प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या आयकर विभागाचा धाडींवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने बंद पुकारण्यात आला,असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना केला. तथापि, जनतेचा मनापासून प्रतिसाद नसल्याने बंद फसल्याचा दावाही त्यांनी केला.

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात: नाशिक, नगरला यलो अलर्ट

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून पुकारलेल्या या बंदच्या विरोधात भाजपची व्यापार आघाडी न्यायालयात गेली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आजच्या बंदसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वप्रथम घोषणा केली. नेहेमीप्रमाणे आघाडीतील इतर सर्वांना फरफटत जावे लागले. शिवसेनेलाही सत्ता टिकविण्यासाठी पवारांचे ऐकावे लागले, असा टोला पाटील यांनी लागवला.

उत्तर प्रदेशात लखीमपूर खिरी येथील घटनेचे कोणीही समर्थन करणार नाही. पण त्याचे निमित्त करून राज्यात महाविकास आघाडीने पुकारलेला बंद हा शेतकऱ्यांबद्दलच्या कळवळ्यासाठी नाही तर राज्यात गेले १५ दिवस राजकीय नेत्यांशी संबंधित आस्थापनांवर चालू असलेल्या आयकर खात्याच्या छाप्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पुकारलेला आहे. कोरोनामुळे आधीच लोक त्रस्त असताना जनमताच्या विरोधात बंद पुकारण्यात आला आहे. आपण त्याचा निषेध करतो, असे पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीला शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता नाही. राज्यात वादळांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या आघाडीने मदत केली नाही. अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत केली नाही. मराठवाडा आणि विदर्भात तर अतिवृष्टीमुळे शेती खरडून गेली. त्याबद्दल महाविकास आघाडी काही बोलत नाही आणि उत्तर प्रदेशातील घटनेबद्दल महाराष्ट्रात बंद पुकारत आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या