Thursday, April 25, 2024
Homeनगरसरकार कायदेशीर मार्गाने स्थापन झाल्याचे न्यायालयाच्या निकालाने सिद्ध

सरकार कायदेशीर मार्गाने स्थापन झाल्याचे न्यायालयाच्या निकालाने सिद्ध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे राज्यातल्या सरकारला दिलासा मिळाला आहे. मात्र, याबाबत आमच्या मनात कधीच शंका नव्हती, पण आता राज्यातले सरकार कायदेशीर मार्गाने स्थापन झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे पक्ष निरीक्षक व ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.

- Advertisement -

नगर शहर, उत्तर नगर व दक्षिण नगर या तीन जिल्हाध्यक्ष पदांसाठी इच्छुकांशी संवाद साधण्यासाठी भंडारी नगरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी आ. मोनिकाताई राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर कदम, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आदींसह अन्य उपस्थित होते. यावेळी भंडारी म्हणाले, राज्यातील सरकार घटनेतील सर्व तरतुदींचे, कायद्याचे व संकेतांचे पालन करून लोकशाही मार्गाने स्थापन झाले होते व त्यामुळे तशी भूमिका ही आम्ही आधीपासूनच मांडत आलो आहोत.

आमच्या या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने शिक्कामोर्तब केले आहे, असा दावा भंडारी यांनी केला. काही तरतुदी व निरीक्षणे व्यक्त करून ती मोठ्या पिठाकडे पाठवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, त्यावर आता सुनावणी होईल. लोकशाही प्रक्रियेने तिथे भूमिका मांडल्या जातील व त्यात होणार्‍या निर्णयाचे आम्ही स्वागत करू, असे सांगून ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षणे व निकाल पत्र वेगळे आहे. त्यामुळे राज्यपालांची भूमिका व गोगावले यांची भूमिका याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल पत्राचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर न्यायालयाची निरीक्षणे व निकाल पत्रात नेमके काय म्हटले आहे.

हे समजून घेतल्यानंतर व त्यांचा अभ्यास केल्यावर त्याबाबत अधिक भाष्य करणे योग्य राहील. राज्य सरकारला आता काम करताना कोणतीही अडचण येणार नाही. सरकार घटनेतील तरतुदी, कायदा व संकेत पाळून आणि लोकशाही मार्गाने सत्तेवर आल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून सिद्ध झाले असल्याने आता सरकारच्या वाटचालीला कोणत्याही अडचणी येणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

इच्छुकांची भाऊगर्दी

जिल्ह्यातील तीन जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात पक्ष निरीक्षक म्हणून जिल्ह्यातील साठच्यावर प्रमुख पदाधिकार्‍यांशी संवाद साधला आहे. सर्वांची मते जाणून घेतली आहेत. गुरुवारी नगरला शहर जिल्हाध्यक्ष व दक्षिण नगर जिल्हाध्यक्षसंदर्भातील पदाधिकार्‍यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत व आज शुक्रवारी (12 मे) शिर्डी येथे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष संदर्भातील पदाधिकार्‍यांच्या भावना जाणून घेऊन जिल्ह्याचा एकत्रित अहवाल प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देणार आहे. त्यानंतर प्रदेश भाजपची कोअर कमिटी या तिन्ही पदांबाबत नियुक्तीचा अंतिम निर्णय घेणार आहे, असेही भंडारी यांनी स्पष्ट केले. जिल्हाध्यक्ष पदांसाठी कोणी मुलाखती दिल्या, हे सांगण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. कोणाच्याही मुलाखती घेतल्या नाही. फक्त पदाधिकार्‍यांच्या भावना जाणून घेतल्या, एवढेच त्यांनी सांगितले. दरम्यान, नगर शहरातून 10 जण, नगर दक्षिणेतून 4 जण व नगर उत्तरेतून 3 जण जिल्हाध्यक्ष पदांसाठी इच्छुक असल्याचे समजते.

त्यांच्या प्रवचनाला अर्थ नाही

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नैतिकता म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे, त्यावर भाष्य करताना भंडारी म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी 2019 मधील निवडणुकीनंतर सरकार स्थापन करताना ठाकरे यांना नैतिकता हा शब्द सुद्धा आठवला नव्हता. त्यामुळे त्यांनी आता नैतिकतेवर प्रवचन देण्यात काहीच अर्थ नाही व त्यांना तो अधिकारही नाही, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला.

नगर शहरातून विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांच्यासह दहा जणांनी शहर जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, विद्यमान उपाध्यक्ष सचिन पारखी, बाबासाहेब सानप, सीए राजेंद्र काळे, नितीन शेलार, वसंत राठोड व सुवेंद्र गांधी आदीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. तसेच दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदासाठी नगर तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी अ‍ॅड. युवराज पोटे, कर्जतचे शांतीलाल कोपनर, पाथर्डीचे राहुल कारखिले व जामखेडचे डॉ. ज्ञानेश्वर झेंडे यांचा समावेश होता आणि आज शुक्रवारी शिर्डी येथे होणार्‍या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदासाठी नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शिर्डी येथील शिवाजी गोंदकर व श्रीरामपूरचे प्रकाश चित्ते यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या