तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करण्याची भाजपाची मागणी

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

मागील वर्षीप्रमाणे देखील यावर्षी चाळीसगाव तालुक्यात सुरू असलेल्या संततधार व अतिरिक्त पावसामुळे कापूस, मका, बाजरी, केळीसह जवळपास सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

सलग दुसर्‍या वर्षी ही वेळ आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य शासनाने चाळीसगाव तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई द्यावी व सरसकट तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी येथील भारतीय जनता युवा मोर्चातर्फे करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदनही तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले.

मागील वर्षी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जावून फळबागांना हेक्टरी ५० हजार रुपये व इतर पिकांना हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा केली होती, मात्र त्यातील एकही रुपया शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाला नाही. मागील वर्षीचा या सरकारचा वाईट अनुभव पाहता, यावर्षी शेतकर्‍यांना मदत मिळेल की नाही याची शास्वती नाही. भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना शेतकर्‍यांना बोंडअळी, लाल्या रोग, पीकविमा आदी माध्यमातून भरीव मदत देत शेतकर्‍यांना आधार दिला होता.

या सरकारने देखील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी भरीव तरतूद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. विविध मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे चाळीसगाव तालुक्याचे तहसिलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले, निवेदनाची दखल घेतली न गेल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.

यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार, भाजपा युवा मोर्चाशहराध्यक्ष भावेश कोठावदे, तुषार रावण चव्हाण, आदित्य महाजन, विशाल पाटील, दिनेश महाजन, मनोज पाटील, किशोर बाबुराव कुमावत, विशाल राजपूत, सुनील सोनवणे, कांतीलाल जाधव, बळवंत पवार, सुनील सानप, चुडामण सोनवणे, भीमराव जाधव, संजय साळुंखे, प्रवीण पवार आदी उपस्थित होते.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *