Saturday, April 27, 2024
Homeनगरसंगमनेरच्या कारागृहात साजरा झाला चक्क वाढदिवस

संगमनेरच्या कारागृहात साजरा झाला चक्क वाढदिवस

संगमनेर | शहर प्रतिनिधी

संगमनेरचे कारागृह विविध कारणामुळे नेहमी चर्चेचा विषय ठरले आहे. या कारागृहात काही दिवसांपूर्वी चक्क एका कैद्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला….

- Advertisement -

या कारागृहामध्ये कैद्यांना विविध सुविधा सहज उपलब्ध होत असतानाही याकडे तुरुंगाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीलगतच नवीन कारागृह बांधण्यात आलेले आहे. तीन बराकी असलेल्या या कारागृहामध्ये नेहमी क्षमतेपेक्षा जास्त कैदी शिक्षा भोगत असतात.

कारागृहाच्या बंदोबस्तासाठी वेगवेगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आहे. मात्र या कर्मचाऱ्यांची कारागृहातील कैद्यांवर मेहेरनजर असल्याचे दिसत आहे. कारागृहातील कैद्यांना कुठलीही नियमबाह्य सुविधा देऊ नये असे नियम असताना संगमनेरच्या कारागृहात मात्र वेगळे चित्र आहे. या कारागृहातील कैद्यांना गुटखा- तंबाखू च्या पुड्या, पाण्याच्या बाटल्या अशा विविध सुविधा सहज मिळतात. अनेक कैद्यांना घरचे जेवण मिळते. कारागृह प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या कैद्यांना कारागृहातच वेगवेगळ्या वस्तू मिळतात.

या कारागृहात गेल्या काही दिवसांपासून शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. वाढदिवसासाठी मोठा केकही आणण्यात आला होता. बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांना बाहेर पाठवून हा वाढदिवस कैद्यांनी साजरा केला. कैद्याचा वाढदिवस साजरा झाल्याने कारागृह प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत होत असल्याचे समोर आले आहे. कारागृहात वाढदिवसासाठी केक कोणी आणला? केक आणणाऱ्याला बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी का अडविले नाही ? तुरुंग प्रशासन व पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधितावर कारवाई का केली नाही असे अनेक प्रश्न हा वाढदिवस साजरा झाल्याने निर्माण झाले आहे.

संगमनेरच्या कारागृहात अनेक जुने कैदी शिक्षा भोगत. आहे. नवीन कैद्यांना त्यांच्याकडून अनेकदा मारहाण केली जाते. याकडेही पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. हा वाढदिवस साजरा झाल्यानंतर या कारागृहात मागील आठवड्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. कॅमेरे असतानाही कारागृहात कैद्यांना गुटखा तंबाखू सहज उपलब्ध होत आहे. भोजन पुरविणाऱ्या इसमाच्या मोबाईलवरून काही कैदी सहज आपल्या मित्रमंडळींना संपर्क साधत असतात. बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांचे मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. तुरुंग अधिकाऱ्यांना हा मोबाईल सापडूनही त्यांनी याबाबत कोणतीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कुलरमध्ये आढळला मोबाईल

संगमनेरच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेले कैदी मोबाईलचा वापर करत असल्याचे वृत्त ‘दैनिक सार्वमत’ ने प्रसिद्ध केले होते. कारागृहात मोबाईल नसल्याचे त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले होते. मात्र काही दिवसानंतर कारागृहाच्या दरवाजासमोर ठेवण्यात आलेल्या कूलर मध्येच एक छोटा मोबाईल सापडला होता. हा मोबाईल आतमध्ये कोणी आणला. मोबाईलचा चार्जर कोणी पुरवला व मोबाईल सापडल्यानंतर संबंधितांविरुद्ध पोलीस अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली असे सवाल आता विचारले जाऊ लागले आहेत. कारागृहात मोबाईल वापरणे बेकायदेशीर असतानाही काही कैदी मोबाईलचा सर्रास वापर करत होते. कारागृहातील कैदी मोबाईलवर बोलत असतानाही बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले होते. पोलीस अधिकारी आता काय कारवाई करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले. पोलीस ठाण्याच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यातील फुटेज पाहून संबंधितावर कारवाई करण्याची गरज आहे.

जेलमध्ये कैद्यांचा वाढदिवस साजरा झाला नाही. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलीस निरीक्षकांचा राऊंड होतो, मोबाईल कसा जाईल. लोक काही चर्चा करतात मात्र मोबाईल सापडला नाही. आमचे महसूलचे आंदोलन चालू होते तेव्हा मला काही कल्पना नाही. तसे काही घडले नाही.

पिराजी भडकवाड, तुरुंगाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या