Friday, April 26, 2024
Homeनगरबीलाअभावी ठेकेदाराने नाट्यगृहाचे काम केले बंद!

बीलाअभावी ठेकेदाराने नाट्यगृहाचे काम केले बंद!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मनपाच्या साडेसात कोटी रुपये खर्चाच्या नाट्यगृहाचे काम सध्या बंद आहे. ठेकेदाराला महापालिकेने आजपर्यंत 1 कोटी 92 लाख रुपये अदा केले आहेत.

- Advertisement -

ठेकेदाराने आणखी दोन कोटी रुपयांची बिले महापालिकेत दिली आहेत. पण बांधकाम विभागातील अंतर्गत वादामुळे ठेकेदाराला बिल अदा करण्यात आलेले नाही. पैसे मिळत नसल्याने ठेकेदाराने काम बंद केले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यामुळे नगरकर नाट्यरसिकांचा हिरमोड आजही कायम आहे.

दरम्यान, करोना संकट काळात मनपाची वसुली घटली, देणेदारी वाढली, नगरकरांकडे कराची उधारी थकली, नाट्यगृहाचे काम पैशाअभावी थांबले. अशाही काळात महापालिकेने दोन कोटी रुपयांची एफडी करून ठेवलीय. त्या राखीव निधीसाठी आता ओढताण सुरू झालीय. बड्या ठेकेदाराला ती रक्कम देण्यापेक्षा आमच्यासारख्या छोट्या ठेकेदारांची बिले द्यावीत, या मागणीसाठी ठेकेदार महापालिकेत हेलपाटे मारताहेत.

रिलायन्ससह अन्य कंपन्यांनी शहरातील रस्ते खोदाईपोटी दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे साधारणत: दीड वर्षापूर्वी जमा केले आहेत. रस्ते खोदाई या हेडखाली ही रक्कम ठेवण्यात आली. त्यातून रस्ते खोदाई होणार्‍या ठिकाणी पॅचिंग व इतर रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती.

नगरसेवकांनी ज्याच्या त्याच्या वॉर्डात ही कामे ठेकेदाराकडून करून घेतली. किरकोळ कामे असल्याने बांधकाम विभागामार्फत ती खतविली गेली. कामे झाली अन् बिले काढण्यासाठी तयारी सुरू झाली. पण बिलाचा विषय निघाला त्यावेळी रस्ते खोदाईत पैसेच शिल्लक नसल्याचे निदर्शनास आले.

नगरसेवकांनी चौकशी केली असता तत्कालीन महापालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने दोन कोटी रुपयांची एफडी करत ते पैसे राखून ठेवल्याचे समजले. रस्ते खोदाईपोटी वॉर्डावॉर्डात किरकोळ कामे केलेल्या शंभरावर ठेकेदारांचे 80 लाख रुपये थकीत असून ते मिळावीत यासाठी छोटे ठेकेदारही महापालिकेत हेलपाटे मारत आहेत.

छोटे ठेकेदार बिल मिळावे यासाठी चकरा मारत आहेत. पैसे नसल्याने त्यांना बिल देणे शक्य नाही. एफडी मोडून पैसे द्या असे सुचविले, पण आपले कोणी ऐकत नाही. कॅफोंना विचारात न घेताच एफडीचा निर्णय झालेला आहे. बांधकाम विभागच टिपण्णी तयार करून आयुक्तांची मंजुरी घेतात. त्यामुळे मी याबाबत अनभिज्ञ आहे.

– प्रवीण मानकर, कॅफो, मनपा.

- Advertisment -

ताज्या बातम्या