गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेला बाईक रॅली : 80 जणांना अटक

jalgaon-digital
2 Min Read

पुणे (प्रतिनिधि) – व्हॉट्सॲप स्टेटसच्या वादावरून पुण्यातील बिबवेवाडी भागातील माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराचा खून झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला कोरोनामुळे निर्बंध लागू असताना 150-200 जणांनी बाईक्स रॅली काढण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी बाईक रॅली काढणाऱ्या 80 जणांना ताब्यात घेतले आहे. यासाठी नेमलेल्या 15 पथकांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे.

व्हॉट्सॲप स्टेटसवरुन झालेल्या वादानंतर टोळक्यानं बिबवेवाडी इथं सरोजिनी क्लिनिकसमोर माधव वाघाटे याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधव वाघाटे हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरवरील सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला तडीपारही करण्यात आलं होतं. व्हॉट्सॲप स्टेटसवरुन झालेल्या वादानंतर टोळक्याने त्याची हत्या केली होती.

त्यानंतर शनिवारी दुपारी माधव वाघाटेवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यावेळी दुचाकींची रॅली काढण्यात आली होती. करोनाचे निर्बंध असताना धनकवडी ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत ही रॅली काढण्यात आली. या प्रकरणी 150 ते 200 जणांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात सिद्धार्थ पलंग, कुणाल चव्हाण, सुनिल खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ऋषिकेश भगत, गणेश फाळके अशा वाघाटेच्या साथीदारांचा समावेश आहे.

पुण्यात एकीकडे करोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. प्रशासकीय पातळीवर आणि पोलिसांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिवाचं रान केलं जात आहे. अशातच सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला 125 बाईकची रॅली काढल्याचं समोर आल्याने संताप व्यक्त केला जात होता.

Share This Article