Wednesday, April 24, 2024
Homeनगरबीग मी घोटाळ्यातील चार आरोपींना पकडले

बीग मी घोटाळ्यातील चार आरोपींना पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील बिग मी इंडिया कंपनीद्वारे आर्थिक गुंतवणूकदारांची सुमारे पावणे आठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी सोनिया सोमनाथ राऊत, वंदना चंद्रकांत पालवे, प्रितम मधुकर शिंदे व शलमन दावीत गायकवाड या चौघांना अटक केली. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचा अतिरिक्त कार्यभार असलेले पोलिस उपअधीक्षक (गृह) संजय नाईक पाटील व सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री पाचपुते यांच्यासह पोलीस पथकाने ही कामगिरी केली.

- Advertisement -

बिग मी इंडिया कंपनीद्वारे गुंतवणूकदारांची 7 कोटी 76 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार कोल्हापूर येथील सतीश खोडवे यांनी 4 डिसेंबर 2021 रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे. या आर्थिक गुन्ह्याचा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेद्वारे सुरू आहे. या पोलिसांनी याआधी बिग मी इंडिया कंपनीचा प्रमुख सोमनाथ राऊत याला अटक केली आहे. तर अन्य आरोपींपैकी 6 आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वी जिल्हा न्यायालायाने फेटाळला आहे. त्यानंतर यातील आरोपी संचालक सोनिया सोमनाथ राऊत हिने उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्याकडे अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता, पण तोही फेटाळण्यात आला आहे.

त्यामुळे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करीत सोनिया राऊतसह वंदना पालवे, प्रितम शिंदे व शलमन गायकवाड या चौघांना अटक केली. या आर्थिक गुन्ह्यासंदर्भात 67 गुंतवणूकदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. तक्रारदार सतीश खोडवे यांच्यासह उदय जोशीलकर, सुशील कलगोंडा पाटील, दिनकर केदार, सुकुमार खवाटे व अन्य गुंतवणूकदार या प्रकरणातील आरोपींवर कायदेशीर कारवाई व्हावी, म्हणून नगर जिल्हा पोलिसांकडे पाठपुरावा करीत आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह उपअधीक्षक संजय नाईक पाटील यांना भेटून त्यांनी फसवणुकीसंदर्भातील पुरावेही दिले आहेत.

यात कंपनी समवेत झालेले त्यांचे करार, गुंतवणूक रकमेची पावती, धनादेश, गुंतवणूक केलेल्या रकमांचे बँक स्टेटमेंट, बिग मी इंडिया कंपनीने केलेल्या जाहिराती, जाहीर केलेले बिझनेस प्लॅन आदींसह वापरण्यात आलेले मोबाईल व मोबाईल नंबर, व्हॉट्सअ‍ॅप मेसेज, कॉल रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग वृत्तपत्रांतून केलेल्या जाहिराती, गुंतवणूकदारांना जास्त गुंतवणूक करण्यासाठी कंपनीच्या लेटर हेडवर दिलेले पत्र, गुंतवणुकीवरील परताव्याचे आमीष अशा पुराव्यांचा यात समावेश आहे. दरम्यान, कुकाणा अर्बन मल्टिस्टेट निधी लिमिटेडच्या माध्यमातूनही आरोपी व संचालकांनी आर्थिक फसवणूक केलेली असून त्यांच्याविरुद्ध 420 व एमपीआयडी कलमांंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या