Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदिव्यांग युवतीच्या स्वप्नांना मिळणार गती

दिव्यांग युवतीच्या स्वप्नांना मिळणार गती

नाशिक । Nashik

वेगवान जेट युगात माझ्या छोट्या छोट्या स्वप्नांना सायकलमुळे नक्कीच गती मिळेल. मी जुन्या सायकलची अपेक्षा केली असतांना माझ्या हाती नवीकोरी सायकल आली आहे.आता माझ्या प्रगतीला वेग येईल असे भावपूर्ण उद्गार अंजली प्रधान हिने उत्स्फूर्तपणे काढले.

- Advertisement -

निवृत्त वायुसेना अधिकारी सतीश पेठकर विश्वनाथ सेवा समूहाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवीत असतात. त्यांच्या संपर्कात अंजली प्रधान ही दिव्यांग युवती आली. आनंदवली – चांदसी भागात राहून जिद्दीने धडपडणाऱ्या या युवतीला सायकलची गरज होती.

पेठकर यांनी पेठे हायस्कूलच्या आपल्या व्हाट्सएप समूहावर छोटेसे निवेदन दिले. त्याला वर्गमित्र व सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिलीप खातळे यांनी त्वरित उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. अंजलीच्या पसंतीनुसार नवीकोरी सायकल त्यांनी खरेदी केली. उच्च अधिकारी रणजित नांदूरकर व डॉ. मानसी नांदूरकर यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी बोलतांना अंजलीने थोडक्यात आपला संघर्षमय जीवनपट उलगडला. अपंगत्वावर मात करीत तिने एमए, बीएड पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र सरकारी राहुद्या चांगली खासगी नोकरीही तिला मिळाली नाही. पोलिओने पाय अधू असतानाही तिने ११ वेळा कळसुबाई शिखर सर केले आहे.

ती उत्तम जलतरणपटू असून राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. सध्या ती सक्षम या अपंग सहाय्यता संस्थेत काम करते. तिला समाजाकडून केवळ सहानुभूती नको तर स्वाभिमानाने आपल्या पायांवर खंबीरपणे उभे रहायचे आहे. आपल्या आईचे होणारे अतोनात कष्ट कमी करायचे आहेत असे तिने सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या