Friday, April 26, 2024
Homeजळगावभुसावळ : न.पा.पोट निवडणुकीत राजकुमार खरात सर्वपक्षीय उमेदवार

भुसावळ : न.पा.पोट निवडणुकीत राजकुमार खरात सर्वपक्षीय उमेदवार

बिनविरोधसाठी समाजातील पदाधिकार्‍यांची बैठक : आज अपक्ष उमेदवारी दाखल करणार

भुसावळ । प्रतिनिधी

- Advertisement -

येथील प्रभाग क्रमांक चारच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे नगरसेवक स्व. रवींद्र बाबुराव खरात यांचा मुलगा राजकुमार रवींद्र खरात यांना या निवडणुकीत सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन अपक्ष उमेदवार म्हणून बिनविरोध निवडून द्यावे,असा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे राजकुमार खरात हे सोमवार रोजी दुपारी 12 वाजता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

येथील शासकीय विश्रामगृहामध्ये दि.8 रोजी दुपारी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हा ठराव करण्यात आला. बैठकीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, पीआरपीचे प्रदेश पदाधिकारी जगन सोनवणे, आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, जनाधारचे  गटनेते उल्हास पगारे, बहुजन वंचित आघाडीचे बाळा सोनवणे, शरद सोनवणे, काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रवींद्र निकम, आरपीआयचे लक्ष्मण जाधव, भाजपाचे सरजू तायडे, नगरसेवक रवी सपकाळे, बाळू सोनवणे, प्रकाश सोनवणे, संगीन खरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दि. 6 ऑक्टोबर रोजी या प्रभागाचे नगरसेवक रवींद्र खरात यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे या प्रभागात रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे. त्यामुळे या प्रभागातून  स्व. नगरसेवक रवींद्र खरात यांच्या परिवारातील उमेदवार बिनविरोध निवडून देऊन त्यांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली द्यावी,  अशी भावना  पुढे आली होती. त्यामुळे समाजाच्या सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित केली.त्यात त्यांच्या परिवारातील उमेदवारास अपक्ष बिनविरोध निवडून देण्याचा ठराव केला व या पोटनिवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण तोडगा काढला .

दरम्यान,दि.9 रोजी दुपारी 12 वाजता राजकुमार रवींद्र खरात हे एकमेव उमेदवार अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तरी त्यांच्या  उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वसमाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांतर्फे करण्यात आले आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या