Friday, April 26, 2024
Homeजळगावबीएचआर घोटाळा : सूरज झंवरविरोधातही पुणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

बीएचआर घोटाळा : सूरज झंवरविरोधातही पुणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

जळगाव – Jalgaon :

बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने फरार असलेल्या मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा संशयित सूरज झंवर यांच्या विरोधात काल मंगळवारी पुणे न्यायालयात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने दोषारोपत्र दाखल झाले आहे.

- Advertisement -

तीन महिन्याच्या आत म्हणजे ८९ व्या दिवशीच आर्थिक गुन्हे शाखेने दोषारोपपत्र दाखल करण्याची कामगिरी केली असली तरी याच घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर तसेच जितेंद्र कंडारे यांना अटक करण्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखा मात्र सपशेल अपयशी ठरली आहे. दुसरीकडे याच घोटाळ्यातील संशयित महावीर जैन याला पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सुनील झंवर यांची साई मार्केटींग ऍण्ड ट्रेडींग नावाने कंपनी आहे. या कंपनीत सूरज झंवर हा संचालक असून तो कंपनीचा भागीदार आहे. या कंपनीच्या नावाने निविदा भरुन बीएचआरच्या कोट्यवधींच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात निष्पन्न झाले होते. यानंतर सूरज झंवर यास २२ जानेवारी रोजी जळगावातून जय नगर येथील राहत्या घरुन अटक केली होती.

यानंतर त्याला २ फेब्रुवारीपर्यंत ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सद्यस्थितीत सुरज झंवर हा न्यायालयीन कोठडीत पुणे येथील कारागृहात आहे. दरम्यान यापूर्वी २३ फेब्रुवारी रोजी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने पुणे येथील न्यायालयात संशयित सुजीत वाणी, धरम साखला, महावीर जैन, विवेक ठाकर, कमलाकर कोळी यांच्या विरोधात २ हजार ४०० पानांचे दोषारोप पत्र दाखल केले आहे.

महावीर जैनला जामीन मंजूर

बीएचआर संस्थेत महावीर जैन लेखापरीक्षक होता. त्याची नियुक्ती बेकायदेशीररित्या अवसायक जितेंद्र कंडारे याने केली होती.

या घोटाळ्यात ज्या मालमत्ता विक्री झाल्या त्यात महावीर जैन याचाही सहभाग होता. त्यानुसार पथकाने महावीर जैन याला अटक केली होती. त्याने जामीनासाठी पुणे येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर कामकाज होवून न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे.

कंडारे, सुरज झंवरचा जामीनासाठी अर्ज

या घोटाळ्यातील मुख्य संशयित जितेंद्र कंडारे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. आता त्यानेही पुणे येथील न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

सुरज झंवरने काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने ११ दिवसांचा घेतलेला रिमांड रद्द करावा यासाठी याचिका दाखल केली होती. ती फेटाळण्यात आली आहे.

तसेच त्याला खालच्या कोर्टात जामीनासाठी अर्ज करावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार संशयित सुरज झंवर यानेही जामीनासाठी अर्ज दाखल केला असून त्याच्या जामीनावर उद्या गुरुवारी कामकाज होणार आहे.

झंवर, कंडारेला अटक करण्यात अपयशी

बीएचआर घोटाळयाप्रकरणी पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल झाला. दुसर्‍याच दिवशी २६ फेब्रुवारी रोजी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावातील बीएचआर पतसंस्थेचे मुख्य कार्यालयासह, अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर यांच्यासह इतरांच्या घरी तसेच कार्यालयांवर छापा टाकून कारवाई केली व काहींना अटक केली.

या कारवाईपासून म्हणजेच तब्बल पाच महिन्यांपासून या गुन्ह्यातील मुख्य संशयित सुनील झंवर तसेच जितेंद्र कंडारे हे मोकाटच असून त्यांना अटक करण्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखा अपयशी ठरली आहे.

दुसरीकडे दोघा संशयितांच्या फरार घोषित करण्याच्या कार्यवाही सुध्दा कोरोना अन् लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडली आहे. झंवर, कंडारे यांना अटक होत नसल्याने विविध चर्चांना उधाण येत असून दोघांना अटक होणार की नाही, असेही प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

जैनचा जामीन रद्दसाठी मुंबई न्यायालयात रिटपिटीशन

महावीर जैनचा जामीन मंजूर झाला असून त्याचा जामीन रद्द करावा यासाठी ऍड मनोज नायक यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात रिटपिटशीन दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्य संशयित सुनील झंवर, जितेंद्र कंडारे यांना अटक होत नाही. तोपर्यंत जामीन देवू नये अशा आशयाने ही रिटपिटीशन दाखल झाल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या