Thursday, April 25, 2024
Homeनगरअधिकारी व ठेकेदारांच्या दुर्लक्षीतपणामुळे नागरिकांना मनःस्ताप

अधिकारी व ठेकेदारांच्या दुर्लक्षीतपणामुळे नागरिकांना मनःस्ताप

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परीसरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाकडे प्रशासनासह संबंधितांच्या दुर्लक्षीतपणामुळे अनेक ठिकाणी शेतकरी व ग्रामस्थांना अडचणी निर्माण झाल्याचे दिसत आहे. आ. लहु कानडे यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी परीसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.

- Advertisement -

भोकर परीसरात सध्या भोकर ते श्रीक्षेत्र अडबंगनाथ देवस्थान रस्त्याचे काम सुरू आहे. येथील ग्रामस्थांनी या कामादरम्यान गावालगत असलेल्या शेंदडगंगा नामक नाल्याच्या पाण्याचा प्रवाहाकडे दुर्लक्ष करत सिमेंट नळ्या टाकल्या, हा नाला खोदाई दरम्यान लगतच असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या संरक्षक भिंतीला इजा पोहचली आहे, ही बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून दिली आहे. सध्या पाऊस असताना नाल्यातील माती काढून पाणी वाहते करून न दिल्याने हे पाणी येथील हनुमानमंदीर व आरोग्य उपकेंद्राला वळसा घालून अहिरे यांचे घरासमोरून नाल्यात उतरत आहे.

पर्यायाने याचा त्रास ग्रामस्थांसह सर्वांनाच होत आहे. शिवाय आरोग्य उपकेंद्राच्या भितीचा पाया मोकळा झाल्याने या नाल्यास पूर आल्यास सर्व पाणी आरोग्य उपकेंद्रात जाणार आहे. भोकर ते खानापूर या रस्त्याचे काम पूर्ण झाले, परंतु भोकरच्या हनुमानवाडी शिवारातील गट नं. 376 व 377 दरम्यान पावसाचे अतिरीक्त पाणी वाहून जाण्यासाठी तेथे पूल बांधण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचे येथील शेतकरी बाबासाहेब विधाटे यांनी सांगितले. श्रीरामपूर-नेवासा राज्य मार्गाचे रूंदीकरण व डांबरीकरण होत असून भोकर-टाकळीभान शिवारातील साधनावाला पुलाच्या कामादरम्यान पर्यायी रस्त्याचा मातीचा ढिगारा पुलाचे काम होऊनही काढला नाही.

टाकळीभानच्या बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी साठत असल्याने या शेतातील उभ्या फळझाडांना अतिपाण्यामुळे धोका पोहचला आहे. बर्‍याच क्षेत्रात पाणी साठल्याने शेती नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत संबंधितांशी अनेकदा संपर्क करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे पाटबंधारेचे सेवानिवृत्त अभियंता अहिलाजी खैरे यांनी सांगितले. संबंधित प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार यांनी या कामाकडे व नागरिकांच्या मागणीवजा सुचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून या कामात आ.लहु कानडे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या