Friday, April 26, 2024
Homeनगरविष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या भिशी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या भिशी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

भिशीत अडकलेले लाखो रुपये वसूल होत नसल्याने व भिशीमधील सदस्यांंकडून होत असलेल्या दमदाटीला वैतागून विषारी पदार्थ सेवन

- Advertisement -

करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या येथील भिशी चालकाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विषारी पदार्थ सेवन करण्यापूर्वी 14 जणांवर त्याने आरोप करुनही त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याऐवजी पोलिसांनी या भिशी चालकावरच गुन्हा दाखल केला आहे.

दिनांक 20 फेब्रुवारी रोजी शहरातील एका खाजगी रुग्णालयात अजिज याकूब मोमीन (वय 36) या हॉटेल व्यवसायीकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याने विषारी पदार्थ सेवन केल्याने उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले होते. पोलीस त्याचा जबाब घेण्यासाठी गेले असता तो जबाब देण्याच्या परिस्थितीत नव्हता.

दिनांक 2 मार्च रोजी तो जबाब देऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितल्याने पोलिसांनी त्याचा जबाब घेतला. अजिज मोमीन याची 30 लोकांमध्ये भिशी चालू होती. भिशीमधील 30 पैकी सद्दाम मुनावर पठाण, रईस मनियार पेंटर अशा दोघांना इतर लोकांचे राहिलेले पैसे भरून टाका असे त्याने सांगितले होते. यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली.

यामुळे वैतागलेल्या मोमीन याने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल आयूब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अजीज मोमीन याच्या विरुध्द भारतीय दंड संहिता 1860 कलम 309 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

विषारी पदार्थ सेवन करण्यापूर्वी त्याने लिहीलेल्या चिठ्ठीत 14 जणांचा उल्लेख केला होता. पोलिसांनी यापैकी कुणावरही अद्याप कारवाई केलेली नाही. याबाबत दैनिक सार्वमतने सर्व प्रथम वृत्त प्रकाशित केले होते. पोलिसांनी ही माहिती दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या