मस्तकरेषेमुळे माधुरीला मिळाली यशाची गुरूकिल्ली

jalgaon-digital
6 Min Read

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड – 8888747274

माधुरी दीक्षित यांचा जन्म 15 मे 1967 रोजी झाला. त्यांचे कुटुंब मुंबईत वास्तव्यास होते. तीन वर्षांच्या वयातच त्यांना नृत्याची आवड निर्माण झाली आणि कथ्थक नृत्यात आठ वर्षांचे प्रशिक्षण घेतले. नंतर व्यावसायिक प्रशिक्षित कथ्थक नर्तक म्हणून त्या नावारूपास आल्या.

माधुरी म्हणतात, नऊ वर्षांची असताना मला कथक नर्तक म्हणून शिष्यवृत्ती मिळाली. मला हे देखील आठवतं की एखाद्या नृत्याामुळेच माझे नाव पहिल्यांदा वर्तमानपत्रात आलं होतं.

त्यावेळी मी सात-आठ वर्षांची होते. कथकचे नृत्य गुरु पौर्णिमा उत्सवात सादर केले आणि तिथे एक पत्रकार होते.

त्यांनी लेख लिहिला होता. त्यात म्हटले होते की, या लहान मुलीने शो जिंकला. त्यामुळे मी खूप आनंदी व उत्साही होते. नृत्याने मला लोकांसमोर माझे कर्तृत्व दाखविण्याची संधी दिली.

माधुरी यांनी अंधेरी येथील डिव्हिना चाईल्ड हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्या अभ्यासाव्यतिरिक्त नाट्य अभ्यासक्रमात रस दाखवला.

माधुरी यांनी मायक्रोबायोलॉजी या विषयात पदवी घेतली. 1984 मध्ये राजश्री प्रॉडक्शनच्या अबोध चित्रपटातून त्यांचे सिनेसृष्टीत पदार्पण झाले.

हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरला. परंतु माधुरीच्या अभिनयाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

1986 पर्यंत रिलीज झालेल्या त्यांच्या चार-पाच चित्रपटांना व्यावसायिक यश मिळाले नाही. माधुरी यांचा 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेजाब या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर मोठे यश मिळविले.

भूमिकेसाठी त्यांची प्रशंसा झाली. तेजाब 1988 चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आणि माधुरी रातोरात सुपरस्टार झाल्या. फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही याच चित्रपटामुळे पटकावला.

तेजाबच्या यशाने माधुरी दीक्षित या हिंदी सिनेमाची एक आघाडीची अभिनेत्री म्हणून नावारूपास आल्याने हा त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.

अभिनयासाठी सलग तीन वर्षे फिल्मफेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांच्या नावे झाला. 1992 मध्ये त्यांची मुख्य भूमिका असलेल्या बेटा या चित्रपटात काम केले.

यातील त्यांचा अभिनय व नृत्य लाजवाब होते. बेटा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. पुढे माधुरी दीक्षित व अनिल कपुर यांची जोडी हिट ठरली. या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले.

1990 ते 1997 पर्यंत माधुरी चित्रपट सृष्टीत सर्वात आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. त्यांचे अनेक आघाडीच्या अभिनेत्याबरोबरचे चित्रपट यशस्वी ठरले.

खलनायक हा संजय दत्तसोबतचा असाच एक यशस्वी चित्रपट. कथा आणि अभिनयामुळे गाजलेल्या या चित्रपटाने माधुरीच्या यशाला अधिकच झळाळी मिळाली.

माधुरी 1997 मधे यश चोप्रांचा ङ्गदिल तो पागल हैफ या चित्रपटात झळकली. या चित्रपटाने त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा चौथा फिल्मफेअर पुरस्कार दिला.

याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी सिने पुरस्कारही मिळाला. दिल तो पागल है एक ब्लॉकबस्टर ठरला.

माधुरी यांची चित्रतारका म्हणून यशस्वी व चमकदार कारकीर्द राहिली. त्या प्रेक्षकांसाठी आजही धक धक गर्ल आहेत.

भाग्यकारक हस्तरेषा

माधुरी यांच्या हातावरील रेषा भाग्यकारक आहेत. पण भाग्याबरोबरच कष्टाची जोड लागते. मेहनत करावी लागते. या मेहनतीमध्ये सातत्य राहण्यासाठी तसा निर्धार असणे गरजेचे आहे.

तसेच उत्तम आरोग्य लाभणे महत्वाचे असते. भाग्य आहेच पण त्याबरोबर अपार कष्ट घेणे व कष्ट घेण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती व निर्धार हवा असतो.

हा माधुरी यांना मस्तक रेषा व आयुष्य रेषेकडून मिळाला आहे. मस्तक रेषा सरळ वरच्या मंगळ ग्रहाकडे गेल्याने न थकता अविरत काम केल्याने यशाची प्राप्ती माधुरी यांना लाभली आहे.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी जे नृत्य केले, त्याची प्रशंसा वर्तमानपत्रात छापून आल्याने त्या हुळरून गेल्या होत्या आणि हाच त्यांच्या आयुष्यातील टर्निग पॉईंट होता.

त्यांच्या हातावरील रवी रेषा ही भाग्यरेषेतून उगम पावत असल्याने त्यांच्या प्रत्येक मेहनतीला दाद मिळत गेली. त्याचे मोल मिळत गेले. प्रसिद्धीच्या मागे पैसा आला. भारतीय चित्रपटसृष्टीत नायिकेला नृत्य येत असेल तर ती खूप मोठे जमेची बाजू ठरते.

वैजयंती माला, अशा पारेख, हेमा मालिनी या नृत्यात निपूण अभिनेत्री होत्या. या चित्रतारका ज्या चित्रपटात काम करायच्या त्या चित्रपटात गाणे व नृत्य यांची प्रेक्षकांना मेजवानी असायची. चित्रपट गाणी व नृत्याने हिट होत असत.

नृत्य करताना अंगी अपार शारीरिक शक्ती लागते. न थकता अविरत रियाज केल्याशिवाय नृत्य येत नाही. यासाठी मनाचा निर्धार लागतो. मेहनत करावी लागते व हे सर्व माधुरी यांच्या मस्तक रेषा व आयुष्य रेषेने दिलेले आहे.

मस्तक रेषा सरळ गेल्याने त्यांचा कामाचा निर्धार व सूचनांचे आळस न करता पालन करणे व त्यावर अवलंब करणे या सर्व सरळ व लांब मस्तक रेषेमुळे साध्य झाले.

आयुष्य रेषेने निरोगी शरीर दिले. आजाराच्या कुठल्याही व्याधी दिल्या नाहीत. कायम चैतन्य व काम करण्याची इच्छा, प्रेरणा काटक शरीराने मिळाली.

हे सर्व गुण आयुष्य रेषा व मंगळ रेषेकडून प्राप्त झाले. निरोगी आयुष्य मिळायला भाग्य लागते. आजही चित्रतारका हेमा मालिनी व माधुरी दीक्षित उत्तम नृत्य सादर करतात. त्यामागे त्यांची मेहेनत तर आहेच, परंतु निरोगी शरीराचे वरदान महत्वाचे आहे.

उत्साह नसेल, अंगी ताकद नसेल, व्याधी असतील तर नृत्यात निपुणता येत नाही. नृत्य करताना व्यायाम घडून येतो. व्यायाम केल्यासारखा थकवा येतो. पण सरावातील सातत्यामुळे यावर मात करता येते. या तारका आहार, विहार व योगा तर करतातच.

थकवा म्हणूनच त्यांच्याकडे नसतो. चित्रपटातील एका नृत्यात किती टेक रिटेक होत असतील व किती वेळ शूटिंग चालत असेल त्याबद्दल आपल्याला अंदाज येऊ शकत नाही. मनापासून नृत्यावर प्रेम, त्याची साधना व निर्धार त्याला शरीराची साथ महत्वाची आहे.

त्यासाठी उत्तम मस्तक रेषा मंगळ ग्रहाकडे आडवी गेलेली त्यांच्या हातावर असल्याने त्यांची नृत्याची साधना झाली. जोडीला अभिनयातील मेहनत. यामुळे यशस्वी ठरल्या. आजही त्या चित्रपटसृष्टीतील सेलेब्रिटी आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *