शुभ ग्रहांच्या लाभाने धोनीच्या परिश्रमाचे सार्थक !

jalgaon-digital
8 Min Read

प्रफुुुल्ल कुलकर्णी – ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड,8888747274

महेंद्रसिंग धोनी…भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक. तडाखेबंद फलंदाज आणि कठिण प्रसंगातील कॅप्टनकूल अशी त्याची ओळख. धोनीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी रांची येथे झाला.

त्याचे वडील पानसिंग हे मेकॉन कंपनीमध्ये कनिष्ठ व्यवस्थापक होते. भारतीय क्रिकेट संघात दाखल होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास अनेक आव्हाने आणि खाचखळग्यांनी भरलेला ठरला. 23 डिसेंबर 2004 रोजी बांगलादेशविरूद्ध एकदिवसीय मालिकेतून त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले. प्रारंभी एकदिवशीय क्रिकेटचा यष्टीरक्षक-फलंदाज अशी ओळख असलेल्या धोनीने पदार्पणानंतर वर्षभरात श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्येही स्थान पटकावले. या काळात धोनी यष्टीरक्षण आणि फलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात तळपला.

अल्पावधीत तो भारतीय क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत झाला. 2008 आणि 2009 असे सलग दोन वर्षे आयसीसीचा ‘वन डे प्लेयर ऑफ द इयर’ हा पुरस्कार पटकावणारा तो पहिलाच क्रिकेटपटू. 2007 मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार तर 2009 साली पद्मभूषण या सर्वोच्च नागरी सन्मान मिंळाला. आयसीसी जागतिक कसोटी इलेव्हन संघाचा कर्णधार म्हणून निवड ही देखिल यश अधोरेखिर करणारी कामगिरी.

आयसीसीच्या जागतिक एकदिवशीय इलेव्हन संघात 2009, 2010 व 2013 अशी तीन वेळा कर्णधार म्हणून निवड झाली. भारतीय सैन्याने 1 नोव्हेंबर 2011 रोजी ‘लेफ्टनंट कर्नल‘चा मानद पद धोनीला प्रदान केले. त्यासाठी धोनीने भारतीय सैन्यासोबत प्रशिक्षणसुद्धा घेतले. एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय नावे जमा असलेला तो कर्णधार होय. 2007 मध्ये भारतीय संघ अडचणीत असताना राहुल द्रविडकडून एकदिवसीय कर्णधारपदाची सूत्रे धोनीच्या हाती आली.

यानंतर भारतीय संघाने कात टाकल्याचे दिसून आले. 2013 मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करत चषक पटकावला, तेव्हा सातासमुद्रापार आयसीसीच्या सर्व फॉर्मटमधील क्रिकेट स्पर्धा जिंकणार्‍या संघाचा तो पहिला कर्णधार ठरला. 2008 मध्ये कसोटी संघाचे कर्णधारपद त्याने सांभाळले.

त्यानंतर त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने न्यूझीलंड व वेस्ट इंडीजविरूद्धची मालिका आणि 2008- 2010-2013 यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर चषक जिंकून कमाल केली. 2013 मध्ये तर ऑस्ट्रेलियाला चक्क व्हाईटवॉश देण्यात तो यशस्वी झाला.

40 वर्षात प्रथमच भारतीय संघाने आस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतील सर्व सामने जिंकले होते. 2009 मध्ये धोनीच्याच नेतृत्वात भारतीय संघाने आयसीसी कसोटी क्रमवारीत प्रथम स्थान पटकावले. 2011 मध्ये टाईम्स मासिकाने धोनीला जगातील सर्वात प्रभाशाली व्यक्तीच्या यादीत स्थान दिले होते. त्याच्या नावावर अनेक विक्रम जमा आहेत. थोडक्यात भारतीय क्रिकेट इतिहासात सर्वाधिक यशस्वी क्रिकेटपटूंपैकी तो एक होय!

धोनीच्या हातावरील ग्रह अतिशय शुभकारक आहेत. हातावरील रेषा मात्र सामान्य व्यतीच्या हातावर सापडतात, त्याप्रमाणे आहेत. हातावरील ग्रहांचे शुभत्व असेल तर व्यक्तीच्या प्रत्येक प्रयत्नात यश लाभत जाते. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि व्यक्तीने प्रयत्न व परिश्रम करण्याचे सोडले तर ग्रहांची साथ जितकी मिळावयास हवी तितकी मिळत नाही . हातावरील रेषा भाग्यकारक असणे हे त्या व्यक्तीच्या संचितात व भाग्यात असते अश्या व्यक्तींना थोड्या प्रयत्नात उतुंग यश प्राप्त होते. यशासाठी झगडावे लागत नाही. अतिपरिश्रम करण्याची गरज लागत नाही. भाग्य कायम त्यांच्या दिमतीला असते.

भाग्य रेषा त्यांना साथ देत असते. इथे धोनीच्या बाबत असे नाही. त्याच्या हातावरील रेषा अति भाग्यकारक नाहीत. मात्र हातावर विनाकारण आडव्या तिडव्या रेषा नाहीत. त्यामुळे विचारामध्ये दृढ निर्धार, प्रयत्नवाद व संयम आहे. आपण आतापर्यत खूप सेलिब्रिटींच्या हातावरील रेषांचे भविष्य पहिले. त्यांच्या हातावरील मुख्य रेषा ह्या अतिशय भाग्यकारक आहेत. त्यामुळे थोड्याश्या प्रयत्नाने भाग्य त्याच्या साथीला धावून येते. कमी श्रमात त्यांना यश प्राप्त होते. धोनीच्या बाबतीत ही गोष्ट अजिबात नाही.

सामान्य घरातून आलेल्या क्रिकेटवेड्या धोनीने अख्ख्या क्रिकेट विश्वावर दबदबा निर्माण केला व राज्य केले. धोनी जोपर्यंत डावात खेळतो आहे तोपर्यंक स्पर्धक संघ दबावात असायचा तर भारतीय चाहते आपण सामना जिंकणारच हा विश्वास बाळगून असत. हा विश्वास धोनी याने अनेक वेळा सार्थ ठरवला. ‘मिस्टर कूल’ हे बिरूदही त्याने मैदानावर सिद्ध केले. गोलंदाजाला प्रोत्साहित करते शांतपणे डावपेच आखण्यात तो माहिर आहे. त्यांच्या चेहर्‍यावर क्रोध वा अती आनंद अभावानेच दिसला. हे सर्व गुरु ग्रहाचे कारकत्व आहे. गुरु ग्रहाच्या कारकत्वाने संयम, आडाखे, नियोजन व युक्ती कामास आली आहे. धोनीच्या हातावर नजर फिरविली कि लक्षात येते कि त्याच्या हातावरील शुभकारक ग्रहांची साथ लाभली आहे. मस्तक रेषा, भाग्य रेषा ह्या सामन्यांच्या हातावरील रेषेप्रमाणे आहेत. परंतू हातावरील रवी रेषा हातावरील इतर रेषांपेक्षा अधिक भाग्यकारक आहे.

तिचा एक फाटा रवी बुधाच्या बोटापर्यंत व दुसरा रवी शनीच्या बोटापर्यंत गेल्याने त्यांना अंतरराष्ट्रीय मान-सन्मान व क्रिकेट विश्वात उत्तुंग यश मिळत गेले. स्वतःच्या परिश्रमाच्या जोरावर भाग्य खेचून आणणारा महेंद्रसिंग धोनीच्या अंगठा, गुरु, शनी व रवी बोटांच्या दुसर्‍या पेर्‍यात यव चिन्ह झाले आहे. त्यामुळे गुरु, शनी व रवी ग्रहांचे शुभत्व वाढले आहे.

धोनी यांच्या हातावर भाग्य रेषा चंद्र ग्रहावरून उगम पाऊन वयाच्या 25 व्या वर्षानंतर अतिशुभ झाली आहे. ती शनी ग्रहाच्या मध्यावर थेट गेलेली आहे. त्यामुळे वयाच्या 24 व्या वर्षानंतर आर्थिक आवक उत्तम होऊ लागली. पुढे ती शनी ग्रहावर जातांना अधिकच प्रभावशाली झालेली आहे. हातावरील शुक्र, चंद्र व गुरु ग्रह बलवान आहेत. पहिल्या बोटाखालील गुरु ग्रह, अंगठ्याच्या आतला शुक्र करंगळीच्या बोटाखाली मनगटापर्यंत चंद्र ग्रहाचा उभार शुभदायक आहेत. हात मांसल व गुबगुबीत आहे. तरी मनातल्या मनात इमले बांधणारे, सुखवस्तू, आळशी स्वभाव मुळीच नाही.

कारण हातावरील मस्तक रेषा सरळ वरच्या मंगळ ग्रहाकडे जाताना थोडी चंद्र ग्रहाकडे वळाली आहे. ही मस्तक रेषा मेहनत करायला लावते. दिनचर्येत आळस येऊ देत नाही. कायम कार्यमग्न ठेवते. ठरवलेले काम पूर्ण झाल्याशिवाय किंवा ठरवलेली नित्य व्यायाम, मैदानावरचा सराव पूर्ण केल्याशिवाय चैन पडत नाही. हे सर्व मस्तक रेषेचे गुणधर्म आहेत. मस्तक रेषा सरळ वरच्या मंगळ ग्रहाकडे गेल्याने संयम, बुद्धिचातुर्य व युक्तीने खेळात समोरच्याला नेस्तनाबूत करण्याची क्षमता आली आहे.

मधले बोट शनीचे व शेजारचे रवीचे बोट थोडे वाकडे आहे. कुठलेही बोट वाकडे असता त्याच्या खालच्या तिसर्‍या पेर्‍या खालील ग्रहांमध्ये न्यूनता येते. धोनीला सुरवातीच्या काळात भारतीय संघात जागा मिळविण्यासाठी झगडावे लागले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर एक दिवसीय खेळात 2014 नंतर संमिश्र यश लाभले. 2016-17 नंतर तर त्यांच्या निवृत्तीच्या चर्चा अधिक होत्या. मधले शनीचे बोट तिरके किंवा थोडे वाकडे असता शनी ग्रहाच्या शुभ लाभामध्ये हे अशुभवता येते.तसेच पोटाचे विकार कायमस्वरूपी राहतात.

धोनीचे रवीचे बोट सुद्धा किंचित तिरके आहे व शनीचे बोट रवी ग्रहाकडे जरा जास्तच आकर्षित झालेले आहे. अशा वेळी जातकाला आपल्या मान-सन्मानाची चिंता असते व ती व्यक्ती याबाबत अतीसंवेदनशील असते. येथे रवी ग्रहावरील अति शुभ रेषेमुळे रवी ग्रहातील किंचित तिरक्या बोटाची अशुभता कमी केली आहे. मात्र शनीचे बोट वक्र असल्याने त्याच्यातील अशुभता कायम आहे.

धोनीने जागतिक स्वरूपाचे उत्तुंग यश मिळविले तरी त्यांच्या निवृत्तीचा शेवट गोड झाला नाही. परिश्रमपूर्वक परत एकदिवसीय संघामध्ये व टी 20 सामन्यात पुनरागम केले. परंतू अविस्स्मर्णीय खेळी करून निवृत्ती जाहीर करण्याचे स्वप्न मात्र भंगले. या निवृत्तीच्या काळात आलेल्या अपयशाला शनी ग्रहाचे तिरके झालेले व रवी ग्रहाकडे आकर्षित झालेले बोट व त्यातून शनिग्रहाची वक्रदृष्टी कारणीभूत आहे.

मागच्या वर्षी त्यांच्या चेन्नई संघाला आयपीएल स्पर्धेत अपयश आले. टी-20 संघातूनही निवृत्ती घेताना अपयश आले. आता तरी रवी-शनिग्रह साथ देतो का हे आगामी आयपीएल स्पर्धेत दिसणार आहे. मात्र परिश्रमाच्या जोरावर भाग्य खेचून आणणारा धोनीसारखा दुसरा खेळाडू होणे नाही.

Share This Article