Thursday, April 25, 2024
Homeजळगावभवरलाल जैन यांच्या मोजेक पोट्रेटचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

भवरलाल जैन यांच्या मोजेक पोट्रेटचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

जळगाव । Jalgaon

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांचा आज (ता.25) पाचवा श्रद्धावंदन दिन आहे. कृषिक्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करणार्‍या भवरलालजींचे स्मरण त्यांच्या सानिध्यात येणारी माणसं आणि त्यांच्या कर्तबगारीचा परिचय असलेली माणसंही आपापल्या पद्धतीने गौरव करीत असतात.

- Advertisement -

असाच एक सुंदर प्रत्यय म्हणजे एक मोजेक कलाकृती. जैन पाईप्सचा उपयोग करून जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी जैन व्हॅली परिसरातील भाऊंची सृष्टी येथे 150 फूट लांब व 120 फूट रुंद असे सुमारे 18 हजार चौरस फूट अशी मोठ्या भाऊंची भव्य मोजेक प्रकारातील कलाकृती साकारली. जागतिक नामांकन प्राप्त केलेली ही कलाकृती सलग 98 तासांत साकार झाली आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रतिनिधींनीही याची नोंद घेऊन भवरलालजी जैन यांच्या श्रद्धावंदन दिनाच्या पूर्वसंध्येला याचे जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान केले. आज या कलाकृतीचे लोकार्पण होत आहे.

ही कलाकृती कायमस्वरूपी स्थापित करण्यात आली असून भाऊंच्या सृष्टीतील नयनरम्य अशा भाऊंच्या वाटिकेत जागतिक विक्रम प्राप्त झालेली ही कलाकृती प्रेक्षकांसाठी उपलब्ध असेल. भवरलालजी जैन यांनी कठोर परिश्रमाने बरडं माळरानावर हिरवी सृष्टी साकारली आहे. थेंबाथेंबाच्या बचतीतून भारताच्या कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे, आदर्श कार्यसंस्कृती रचणारे द्रष्टा नेतृत्व ठरले आहे. त्यांनी श्रमाघामानं कोरड्या नक्षत्रांना हिरवाईचं लेणं दिलं. भूमिपुत्रांच्या चेहर्‍यावरचं हास्य हाच सर्वोच्च पुरस्कार मानला.

जैन पाईप्सचा वापर…

पाणी बचत आणि जैन पाईप हे समीकरण दृढ आहे; मोजेक आर्ट जैन पाईप्सच्या सुयोग्य आणि कलात्मक वापरातून साकारता येऊ शकते आणि जागतिक विक्रमसुद्धा त्यामुळे होऊ शकतो, हे भवरलालजी जैन यांच्या पोट्रेटवरून सिद्ध झाले. काळा, करडा, पांढरा या रंगांच्या पीई व पीव्हीसी पाईप्सचा उपयोग करून मनोहारी आणि भव्य कलाकृती साकारली आहे. भवरलालजी यांनी ज्या पाईप्सच्या माध्यमातून शेती केली आणि त्यांच्या उद्योजकीय कारकिर्दीचा पाया रचला त्याच पाईप्सपासून मोजेक स्वरूपात ही कलाकृती साकार केली आहे. हेच ते पाईप्स जे आपल्या भूमीचं सिंचन करतात आणि आपल्या देशाची तहानही तृप्त करून तृषार्थाचा आशीर्वाद घेतात.

मोजेक आर्टसाठी 10 हजार पाईप्स

भवरलालजी जैन यांच्या पोट्रेटसाठी पीई पाईप 25 मेट्रिक टन म्हणजेच नऊ हजार नग तर पीव्हीसी पाईप पाच मेट्रिक टन म्हणजेच एक हजार नग असे एकूण 10 हजार पाईप वापरण्यात आले. 16 ते 22 फेब्रुवारी दरम्यान सात दिवस प्रत्येक दिवशी 14 तास असे एकूण 98 तास अर्थात 5 हजार 880 मिनिटे, 3 लाख 52 हजार 800 सेकंदांत या मोजेक स्वरूपाची कलाकृती साकारली, या कलाकृतीसाठी लागलेल्या पाईपची संख्या सरळ जोडणी केल्यास 21.9 किलोमीटर लांबीपर्यंत होऊ शकते.

असा झाला पोट्रेटचा जागतिक विक्रम…

गिनिज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करण्यासाठी विशिष्ट प्रोटोकॉल असतो. त्यानुसार ज्याठिकाणी विक्रम होत असतात; अशा मोकळ्या जागेची निवड करण्यापासून तर ते पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ चित्रण करण्यात येते. तसेच अशा प्रकारच्या विक्रमाची नोंद होताना तुकड्या तुकड्याने प्रत्येक व्हिडिओची बारकाईने नोंद घेण्यात येते. अशीच नोंद या पोट्रेटसाठीसुध्दा घेण्यात आली. या जागतिक विक्रमाच्या नोंदीसाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या वतीने स्वप्निल डांगरीकर (नाशिक) व निखिल शुक्ल (पुणे) या महाराष्ट्रातील प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली होती.

गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमधील प्रत्येक रेकॉर्ड बघण्यासाठी प्रतिनिधी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असतात. परंतु, कोविड-19 परिस्थितीमुळे साकारत असलेली ही पूर्ण कलाकृती त्यांनी ऑनलाइन पाहिली. याशिवाय गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने जळगाव येथील आर्किटेक शिरीष बर्वे यांची सर्व्हेअर म्हणून नेमणूक केली होती. शिरीष बर्वे यांनी या कलाकृतीचे अवलोकन केले तसेच यातील संपूर्णत: तांत्रिक बाजू, मोजणी, साहित्य आदींची पाहणी करून सत्यता पडताळली आणि निरीक्षणे नोंदवून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डकडे सादर केली. त्यांच्यासह प्राचार्य शिल्पा बेंडाळे, चित्रकार सचिन मुसळे यांची या जागतिक विक्रमाचे साक्षीदार म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने नेमणूक केली होती. स्वप्निल डांगरीकर यांनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान केले.

विश्वविक्रमी कलाकृती सदैव प्रेरणा देणारी- अशोक जैन

कंपनीचे सहकारी प्रदीप भोसले यांच्यासह सहकार्‍यांनी श्रद्धेय मोठ्या भाऊंच्या जन्मदिनी ही कलाकृती अनुभूती स्कूलच्या क्रीडांगणावर साकारली होती. ती कायमस्वरूपी जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध व्हावी, यादृष्टीने जैन व्हॅली परिसरातील भाऊंच्या सृष्टीत आता ही कलाकृती भव्य स्वरूपात साकारली आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी या कलाकृतीच्या माध्यमातून झालेला जागतिक विक्रम हा खरोखरच आनंददायी आहे. श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या कार्यकर्तृत्वाची आठवण आणि प्रेरणा ही कलाकृती निरंतर देत राहील, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या भावना व्यक्त केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या