Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकभऊर ग्रामस्थांचा आदर्श; कोविड सेंटरला दिले ऑक्सिजन मशिन

भऊर ग्रामस्थांचा आदर्श; कोविड सेंटरला दिले ऑक्सिजन मशिन

भऊर | प्रतिनिधी

करोनाची दुसरी लाट ओसरत असतांना शास्रज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता देवळा तालुक्यातील भऊर येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून देवळा कोविड सेंटरला सामाजिक बांधिलकी जोपासत ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन भेट देत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे….

- Advertisement -

भऊर येथील बाबा पवार यांनी समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने हे मशीन देवळा तालुका आरोग्य अधिकारी सुभाष मांडगे, तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांच्याकडे सुपूर्द केले.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः थैमान घातलं होते. या काळात ऑक्सिजन वेळेत मिळाला नाही म्हणून अनेक रुग्णांना दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला. लॉकडाऊनमुळे दुसरी लाट ओसरायला सुरवात झाल्याचे चित्र असले तरी, शास्त्रज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे.

ही तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. या काळात देखील ऑक्सिजनचा तुटवडा भासू शकतो, हा भविष्यातील धोका लक्षात घेता, फुल ना फुलाची पाकळी या हेतूने भऊर ग्रामस्थांनी देवळा कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन भेट दिले.

यावेळी उपपोलीस निरीक्षक खंडेराव भवर, पं.स.तालुका कृषी अधिकारी प्रशांत पवार, कृषी अधिकारी सचिन देवरे, सचिन भामरे, पंकज पाटील, जगदीश पवार आदी उपस्थित होते.

आपल्या एका छोट्याश्या मदतीने कुणाचा तरी जीव वाचू शकतो. अशा पद्धतीची एक पोस्ट भऊर येथील तरुण बाबा पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली. भऊर ग्रामस्थांनी लगेच या पोस्टला प्रतिसाद देत स्वतःहून पवार यांच्याशी संपर्क करत मदत जमा केली. अवघ्या तीन दिवसात मशीन घेण्यासाठी लागणारी मदत गोळा झाली. भविष्यात देखील काही संकट आल्यावर एकजुटीने त्या गोष्टीचा सामना करू असा विश्वास ग्रामस्थांनी दिला. यातून आमच्या गावाच्या एकजुटीचे दर्शन झाल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले व संपूर्ण ग्रामस्थांचे आभार मानले.

देशावर मोठे संकट आल्यावर जर भऊर ग्रामस्थ यांचा आदर्श घेत प्रत्येक गावाने जर शक्य ती मदत व सहकार्य प्रशासनास केल्यास नक्कीच कितीही मोठ्या संकटांना आपण तोंड देऊ शकतो. भऊर गावाने समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला असून इतर गावांनी देखील या ग्रामस्थांचा आदर्श घ्यावा.

दत्तात्रय शेजुळ , तहसीलदार देवळा

- Advertisment -

ताज्या बातम्या