जिथे आहोत तिथेच आषाढी एकादशी साजरी करुया। पांडुरंगाचे दर्शन मनातूनच घेवूया॥

jalgaon-digital
3 Min Read

नेवासा- आषाढी एकादशी आपल्याला पंढरपूरला जाऊन साजरी करता येणार नसली तरी जिथे आहोत त्या गावात कीर्तन भजन कार्यक्रम करावेत. पांडुरंगाचे दर्शन मनातूनच करावे. करोनाच्या प्रसारास मदत होईल असे काहीही करू नका, असे आवाहन श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे विश्वस्त व श्रीक्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांनी केले.

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दिंडी सोहळ्याला यावर्षी खंड पडला. त्यामुळे वारकर्‍यांना उद्देशून ते बोलत होते. महाराज म्हणाले, वारकर्‍यांचे आराध्य दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग.दरवर्षी आषाढी वारीनिमित्त पांडुरंग सर्व भक्तांची वाट पाहत उभा असतो. वारकर्‍यांनाही त्याच्या भेटीची ओढ लागलेली असते. ‘यारे यारे लहानथोर…’ या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे सर्व जाती-धर्मातील बांधव एकत्र येऊन दिंडीत मार्गक्रमण करतात. वारकरी दिंड्या ज्या गावात जातात तिथं एकात्मतेचा मंत्र अवतरलेला दिसतो. पांडुरंगाच्या क्षेत्रापर्यंत जातात आणि तिथे गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान करून कीर्तन-प्रवचन यात रममाण होतात. परंतु सर्व दिवस आपल्या हातात नसतात. शेवटी असं म्हणावं लागेल ईश्वराची इच्छा आहे.

यावर्षी करोना आजाराने मात्र सर्वांचा हा वारीचा आनंद हिरावून घेतला आहे. केंद्र व राज्य सरकार करोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. साथीचा हा आजार जास्त वाढणार नाही यासाठी आपल्या सर्वांनाच काळजी घ्यायची आहे. या वर्षीचा वारीचा आनंद जरी आपल्याला घेता आला नाही, दिंड्या पालख्यांमध्ये जाता आलं नाही तरीसुद्धा आपल्या मनाने आपण सर्व दिंड्या पालख्या घेऊन प्रत्येक मुक्कामावर आपण मनाने गेलो आणि आता काल नववीपासून ज्ञानोबा रायाची तुकोबारायांच्या सर्व पालख्या पंढरपूरला वाहनाने गेलेल्या आहेत. शासनाने तशी व्यवस्था केलेली आहे.

वारी करताना इतरांना जर आपण मृत्यूला निमंत्रण देत असेल तर तेही योग्य होणार नाही म्हणून यावर्षी वारी आपल्याला दिंडी पालखीच्या माध्यमातून करता आली नाही.

प्रत्येक गावामध्ये विठ्ठलाचे मंदिर आहे. मंदिर नसल्यास जवळच्या गावातील विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी कीर्तन भजन कार्यक्रम साजरे करायचे आहेत. सर्व नियम पाळून सर्व सूचनेचे पालन करून आपल्याला हे सर्व कार्य करायचे आहे.

इंग्रज काळात असे घडले होते…

पायी दिंडी नाही असे यापूर्वी एक वेळ इंग्रजांची राजवट असताना एक प्रसंग आला होता. त्यावेळेस प्लेगचा मोठा रोग होता. त्यावेळी वारकरी पादुका घेऊन गेले होते. कोणी पादुका सायकलवरून नेऊन त्यावेळेस वारी केलेली आहे. पांडुरंगाचे दर्शन घेता येत नाही. परंतु ते दुःख सहन केले पाहिजे. आपल्यासमोर भविष्यामध्ये असा प्रसंग येऊ नये यासाठी आपण सर्वांनी मिळून पांडुरंगाला प्रार्थना करू.

तुमच्या आमच्या सर्वांच्या करताच आपण सर्वांनी नियम पाळायचे आहेत. सर्व वारकर्‍यांना आम्ही विनम्र प्रार्थना करतो यावर्षीचे वारी आपण मनातूनच करायची आहे. मनातूनच पांडुरंगाचे दर्शन, चंद्रभागेचे स्नान,कथा कीर्तन आणि हा सर्व कार्यक्रम आपल्या गावातच करून आपण पंढरपुरातच आहोत असा दृष्टिकोन समोर ठेवून आपलं काम करायचं आहे.आपली भक्ती करायची आहे आणि स्वतःला समाधान करून घ्यायचे आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *