Friday, April 26, 2024
Homeनगरपाणी वळविण्यासाठी निधीची कमतरता भासल्यास देवस्थानांच्या देणग्यांचा वापर करा

पाणी वळविण्यासाठी निधीची कमतरता भासल्यास देवस्थानांच्या देणग्यांचा वापर करा

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील समुद्राला जावून मिळणारे पाणी प्रवाही वळण योजनेद्वारे वळवण्यास सुरुवात झाली असून या कामासाठी पैशाची अडचण भासत असल्यास महाराष्ट्रातील सर्व देवस्थानांतील देणग्यांमधील 10 टक्के देणग्या देवस्थान विकासासाठी ठेवून उर्वरीत 90 टक्के देणग्या या कामासाठी खर्च कराव्यात, असे भारतीय जनसंसद संघटनेने सुचवले असून तशी मागणी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे.

- Advertisement -

निवेदनात म्हटले की, सह्याद्री घाटमाथ्यावरील पाणी पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये वळवण्याबाबत मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. याबाबत लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने प्रवाही वळण योजनेद्वारे जवळपास साडेसात टीएमसी पाणी वळवण्याचे प्रस्तावित असल्याचे स्पष्ट केले असून त्यापैकी 12 वळण योजनांची कामे पूर्ण झाली असल्याचे स्पष्ट केले आहे. याद्वारे जवळपास अर्धा टीएमसी (0.44 टीएमसी) पाणी प्रत्यक्ष वळविले जात आहे. 7 योजनांची कामे प्रगतिपथावर असून त्याद्वारे जवळपास दोन टीएमसी पाणी गोदावरी खोर्‍यात वळविण्याचे प्रस्तावित आहे. उर्वरीत 11 प्रवाही वळण योजना भविष्यकालीन असून या 11 योजनांद्वारे जवळपास 5 टीएमसी (4.98 टीएमसी) पाणी गोदावरी खोर्‍यात वळविण्याचे प्रस्तावित आहे.

सदर योजना निधीअभावी रखडू नयेत यासाठी राज्यातील देवस्थानांकडील देणग्यांची रक्कम वापरावी व युद्धपातळीवर काम करून पाणी वळवावे, अशी मागणी केली आहे. निवेदन देताना तालुकाध्यक्ष रामराव भदगले, कारभारी गरड, डॉ. अशोकराव ढगे, डॉ. करण घुले, एस. आर. शिंदे, अ‍ॅड. कैलास बोरुडे, शिवाजीराव फाटके, कल्याणराव मुरुमकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या