साईड इफेक्ट झाल्यास देणार नुकसान भरपाई; भारत बायोटेकची मोठी घोषणा

jalgaon-digital
3 Min Read

दिल्ली | Delhi

भारतात आजपासून करोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशाच्या वेगवेगळया भागात हे लसीकरण सुरु आहे. सर्वप्रथम करोना योद्धे आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लसीचे डोस दिले जात आहेत. दरम्यान

करोना लसीकरणाला प्रारंभ झाला असला, तरी लसींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकने मोठी घोषणा करत करोना लसीचा दुष्परिणाम आढळून आल्यास नुकसान भरपाई दिली जाईल, असे जाहीर केले आहे.

केंद्र सरकारकडून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन करोना लसीचे ५५ लाख डोस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना लस दिल्या जाणाऱ्या लाभार्थ्याला एका सहमती पत्रावर स्वाक्षरी करावी लागणार आहे. करोना लसीचे दुष्परिणाम दिसल्यास गंभीर स्थितीत लाभार्थ्याला नुकसानभरपाई दिली जाईल, असे कंपनीकडून जाहीर करण्यात आले. कोव्हॅक्सिन कोरोना लस घेतल्यानंतर लाभार्थ्याला आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवल्यास त्यावर सरकारी रुग्णालयात उपचार केले जातील. कोव्हॅक्सिन कोरोना लस टोचून घेतल्यानंतर काही गंभीर आजार किंवा स्थिती निर्माण झाल्यास नुकसानभरपाई दिली जाणार आहे. मात्र, कोव्हॅक्सिन कोरोना लसीमुळेच लाभार्थ्याला आरोग्याची समस्या उद्भवली आहे, हे सिद्ध झाले पाहिजे, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

करोना लस घेतल्यानंतर लाभार्थ्याने कोरोना संसर्गाशी निगडीत प्रोटोकॉल पाळणे आवश्यक आहे. तसेच करोनासंबंधातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे, असे सहमती पत्रात नमूद करण्यात आले आहे. कोव्हॅक्सिनच्या क्लिनिकल क्षमतेविषयी माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा आढावा घेतला जात असल्याचे भारत बायोटेककडून सांगण्यात आले.

दरम्यान, आज दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ लस टोचून घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र लिहून आम्हाला भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस नकोय, त्याऐवजी आम्हाला सिरमची ‘कोव्हिशिल्ड’ लस चालेलं असे म्हटले आहे. ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या चाचण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे डॉक्टरांच्या मनात चिंता आहे, असे आरएमएल रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सांगितले. ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या फेजच्या चाचण्या पूर्ण होण्याआधीच वापरासाठी मान्यता दिली आहे. सध्या भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहेत.

भारतात सध्या सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादन केलेली ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना आपातकालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. त्यात भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ स्वदेशी करोना प्रतिबंधक लस आहे, तर ‘कोव्हिशिल्ड’ ही ऑक्सफर्डने विकसित केलेली लस आहे. भारतात सिरम इन्स्टिट्यूट या लसीचे उत्पादन करतेय. काही दिवसांपूर्वी ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींच्या परिणामकारकतेवरुन दोन कंपन्यांच्या प्रमुखांमध्येच वाद झाला होता.

Share This Article