Thursday, April 25, 2024
Homeनाशिकअकरावीच्या जादा प्रवेशावर करडी नजर

अकरावीच्या जादा प्रवेशावर करडी नजर

नाशिक | Nashik

नाशिक शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश क्षमतेपेक्षा जादा (जास्त) प्रवेश होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे.

- Advertisement -

त्या पार्श्वभूमीवर जादा प्रवेशावर वॉच ठेवण्याचा निर्णय नाशिक शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यात चार भरारीपथकांची स्थापना करण्यात येणार असून, त्याद्वारे तक्रारप्राप्त शाळा-महाविद्यालयांची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक भरारी पथकामध्ये तीन मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्यांचा समावेश असणार आहे.

सध्या अकारावीची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. शहरालगत अर्थात महानगरपालिका क्षेत्रापासून दहा किलोमीटर परिघाबाहेर असलेल्या उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जात आहे. मात्र, संच मान्यता नसल्याने संबंधित जादा विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेस बसता येणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अतिरिक्त जागेवरील प्रवेशाची माहिती शिक्षण विभागाकडून संकलित केली जाणार आहे.

शिक्षण विभागाची भरारीपथके शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन संच मान्यतेनुसार मंजूर तुकड्या, अधिकतम प्रवेश क्षमता, शाखानिहाय दिलेले प्रवेश आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती आदींची पडताळणी करणार आहे.

क्षमतेपेक्षा जास्त अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांना संबंधित प्रवेश रद्द करावा लागणार आहे. तसेच प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार जवळच्या शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेण्याची व्यवस्था या महाविद्यालयांवर राहणार आहे.

तपासणीनंतरही अतिरिक्त प्रवेश रद्द न केल्यास संबंधित शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार आहे. तर भरारीपथकांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक विभागाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे गैरमार्गाने प्रवेश देणाऱ्या शैक्षणिक संस्थेचे धाबे दणाणले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या