Saturday, April 27, 2024
Homeनगरलोकप्रतिनिधींबाबत अवमानकारक शब्द वापरताना स्वतःची पात्रता तपासावी : तिकांडे

लोकप्रतिनिधींबाबत अवमानकारक शब्द वापरताना स्वतःची पात्रता तपासावी : तिकांडे

अकोले (प्रतिनिधी) – सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली राजकारण करणारांनी लोकप्रतिनिधींबाबत अवमानकारक शब्द वापरताना आधी स्वतः ची पात्रता तपासावी, अशी खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी सामाजिक कार्यकर्ते संदीप दराडे यांचे वर केली आहे.

अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते संदिप दराडे, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर गंभीर आरोप केले. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने काल शनिवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका विषद केली.

- Advertisement -

समशेरपूर कोविड सेंटर येथे आमदार डॉ. किरण लहामटे, पोपटराव दराडे आदींनी भेट दिली होती. यावेळी स्वतः संदीप दराडे, रावसाहेब वाकचौरे हे ही उपस्थित होते.

आमदार किंवा कोण्या एखाद्या मोठ्या व्यक्तीवर टीका करुन प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला खटाटोप हा व्यर्थ असतो. आ. डॉ. लहामटे यांनी समशेरपूर कोविड सेंटर ला भेट दिल्याचा फोटोचा पुरावा लपून राहिलेला नाही, असेही तिकांडे यांनी म्हटले आहे.

संदीप दराडे यांचा बोलविता धनी कोण आहे. यामुळे उघड झाले आहे. अशा नामधारी सामजिक कार्यकर्ते यांनी राजकीय प्रवेश करावा. सामाजिक कार्यकर्त्याच्या तोंडून राजकीय भाषा शोभत नाही असे पक्षाचे कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर यांनी म्हंटले आहे.

समशेरपूर कोविड सेंटर हे जनसेवेपेक्षा नाव मोठे करण्यासाठी सुरू केलेले आहे. कोविड सेंटर च्या नावाखाली जमा झालेल्या रकमेचा विनियोग कसा झाला याचा पारदर्शक हिशोब द्यावा, अशी मागणी पक्षाचे खजिनदार प्रा. चंद्रभान नवले यांनी केली आहेे.

करोना काळात आमदार स्वतः करोना संक्रमित हा तालुक्यातील प्रत्येक करोना सेंटरला भेटी देत होते. हे विरोधकांना बहुतेक दिसले नसावे. तर ही आरोप-प्रत्यारोप करण्याची वेळ नाही. यापुढे असे आरोप करणार्‍यांना तशाच भाषेत उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष रविंद्र मालुंजकर यांनी दिला आहे.

समशेरपुर कोविड सेंटरला आमदारांनी भेट दिल्याचे फोटो राष्टवादी च्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले मात्र शेजारील केळी-रुम्हणवाडी येथे बंद पडलेल्या कोविड सेंटरची नोंद जिल्हाधिकारी यांचेकडे होती मात्र समशेरपूर च्या कोविड सेंटरची नोंद होत नाही, यात राजकारण नाही तर काय? केवळ भेट देऊन फोटो काढायचे, स्टंटबाजी करायची म्हणजे समस्या सोडवल्या असे होत नाही. असे एक ना अनेक सवाल विरोधी कार्यकर्त्यांनी केले आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक फटकेबाजी पाहायला मिळत आहे. करोनाच्या या संकट काळात सत्ताधारी व विरोधकांकड़ून राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरु झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांमधून याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या