Friday, April 26, 2024
Homeनगरवैजापूरप्रमाणे श्रीरामपूर तालुक्याला निकष लावून नुकसानीचे पंचनामे करावेत - भानुदास मुरकुटे

वैजापूरप्रमाणे श्रीरामपूर तालुक्याला निकष लावून नुकसानीचे पंचनामे करावेत – भानुदास मुरकुटे

माळवाडगांव |वार्ताहर| Malvadgav

श्रीरामपूर तालुक्यातील गोदाकाठ परिसरात अवकाळी पाऊस पडून गारपीट झालेल्या शिवारात सर्वत्र 33 टक्के नुकसान झाले नसले तरी वैजापूर तालुक्यातील बाजाठाण, देवगांव लगतच्या भामाठाण व कमालपूर (ता. श्रीरामपूर) शिवारात सर्वाधिक नुकसान झाले आहे. वैजापूर तहसिलच्या निकषाच्या आधारावर भामाठाण व कमालपूर शिवारातील गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी कमालपूर येथील प्रगतशील शेतकरी भानुदास एकनाथ मुरकुटे यांनी केली आहे.

- Advertisement -

प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात मुरकुटे यांनी म्हटले आहे की, 28 डिसेंबर रोजी गोंडेगाव, उंदिरगाव, सराला गोवर्धन, महाकळवाडगाव, खानापूर, भामाठाण, माळवाडगांव, मुठेवाडगांव या भागात गारपीटीचा तडाखा बसला. परंतू शेजारच्या गंगथडीच्या वैजापूर तालुक्यातील बाजाठाण, देवगाव, चेंडुफळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारांचा वर्षाव झाला. तेवढाच फटका शेजारच्या भामाठाण व कमालपूर शिवारातील पिकांना बसला. पाऊस, चिखल अन् अंधार पडल्यानंतर शेतात जाणे शक्य नव्हते. सकाळी सुर्योदय झाल्यानंतर शेतात गेल्यानंतर सर्वाधिक नुकसान मका, कांदा, ऊसाच्या पानांच्या चिंधड्या पाहून तालुक्यातील कृषी विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला. तर वरिष्ठांकडून पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे सांगण्यात आले.

त्यातच अशोक सहकारी साखर कारखाना निवडणुकीची धांदल असल्याने महसूल विभाग अधिकारी, सर्वपक्षीय पुढारी तिकडे व्यस्त असल्याने आम्हा शेतकर्‍यांचे गार्‍हाणे कुणी ऐकले नाही. भामाठाण व कमालपूर शिवारात उत्तर पट्ट्यात गंगथडीच्याबाजूने सर्वाधिक नुकसान झाल्याचा आवाज वैजापूरप्रमाणे श्रीरामपूर महसुल विभागापर्यंत पोहचला नसल्याने आमच्यावर अन्याय होत आहे, असे मुरकुटे यांनी निवेदनात म्हटले आहे. श्रीरामपूर विधानसभेत मोठ्या पक्षाची उमेदवारी केलेला मी लढवय्या कार्यकर्ता असून उतारवयात माझी परिक्षा पाहू नका. शासनाच्या निकषांच्या किमान 33 टक्के पेक्षाही आमचे नुकसान जास्त आहे. दोन्ही तालुक्याच्या गावांमधे दोनशे फुट फक्त नदी आडवी आहे. शेजारच्या वैजापूर तालुक्यात जो निकष लावला तोच आम्हाला लावून तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी भानुदास मुरकुटे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या