Thursday, April 25, 2024
Homeनगरभांगे ऑरगॅनिक कंपनीच्या संचालकांकडून सव्वापाच कोटीची फसवणूक

भांगे ऑरगॅनिक कंपनीच्या संचालकांकडून सव्वापाच कोटीची फसवणूक

नेवासा फाटा/ नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील खडकाफाटा येथील भांगे ऑरगॅनिक केमीकल प्रा. लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी विश्वास संपादन करुन आमच्या कंपनीकडून वेगवेगळ्या कामाकरीता रोख रक्कम घेवून केलेल्या संयुक्त कराराच्या अटी व शर्तीनुसार न वागता कंपनीचे उत्पादन सतत बंद ठेवून सप्टेंबर 2021 ते फेब्रुवारी 2023 या काळात 5 कोटी 30 लाख 24 हजार 525 रुपयांची फसवणूक केली, अशी तक्रार नेवासा पोलीस ठाण्यात दिली असून त्यावरुन कंपनीचे संचालक संजय भाऊसाहेब भांगे व स्मिता संजय भांगे या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

याबाबत अफसर रतन शेख (वय 49), धंदा- मॅनेजर रा. आझादनगर आष्टी जि.बीड यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, भांगे ऑरगॅनिक केमिकल्स खडका फाटा ता. नेवासा या कंपनीने आमच्या मच्छिंद्रनाथ ओहरसिज प्रा. लिमिटेड आष्टी जि. बीड या कंपनीचा विश्वास संपादन करून कंपनीकडून वेगवेगळ्या कामाकरिता रोख रक्कम घेवून केलेल्या संयुक्त कराराच्या अटी व शर्तीनुसार न वागता त्यांची कंपनीचे उत्पादन कोणत्या न कोणत्या कारणावरुन सतत बंद ठेवून आमच्या कंपनीची सन सप्टेंबर 2021 ते फेब्रुवारी 2023 या काळात 4 कोटी 54 लाख 60 हजार 283 रुपयांची फसवणूक केली आहे.

तसेच आमच्या कंपनीचे घेतलेल्या कर्जाच्या खेळत्या भांडवलावरचा व्याजाचा भुदंड म्हणून 75 लाख 64 हजार 242 रुपये नुकसान केलेले आहे. अशी एकूण 5 कोटी 30 लाख 24 हजार 525 रुपयांची फसवणूक केली असून माझी भांगे ऑग्रॉनिक केमीकल प्रा. लिमीटेड कंपनी खडका फाटा ता. नेवासा यांचे संचालक संजय भाऊसाहेब भांगे व स्मिता संजय भांगे दोन्ही रा. खडकाफाटा ता. नेवासा हल्ली रा. अहमदनगर यांचे विरुध्द तक्रार आहे. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी संजय भाऊसाहेब भांगे व स्मिता संजय भांगे या दोघांवर गु.र.नं. 318/2023 भारतीय दंड विधान कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या