Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्र‘खरं किती टोचतं हे अमृता फडणवीस यांच्या भाषेवरून समोर आलं’ ; भाई...

‘खरं किती टोचतं हे अमृता फडणवीस यांच्या भाषेवरून समोर आलं’ ; भाई जगताप यांचे प्रत्युत्तर

मुंबई –

सचिन वाझे प्रकरणी प्रतिक्रिया देताना, काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पोलिसांच्या पगाराची खाती अ‍ॅक्सिस बँकेत

- Advertisement -

वर्ग केल्याबाबतचा मुद्दा उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख करत इशारा दिला होता. यावर भाई जगताप यांनी खरं किती टोचतं हे अमृता फडणवीस यांच्या भाषेवरून समोर आलं, अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर पुन्हा अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांना उत्तर देत एक ट्वीट केलं होतं. अशातच आता भाई जगताप यांनी पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना त्यांनी केवळ पोलिसांचीच खाती अ‍ॅक्सिस बँकेत वर्ग केली होती असे नाही. तर त्यांनी या एसआरए प्रकल्पातील विकासकांची देखील खाती वरळी येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश दिले होते. 15 फेब्रुवारी 2016ला हे आदेश देण्यात आले होते. जर ही खाती विकासकांनी वर्ग केली नाहीत, तर त्यांना 15 फेब्रुवारी 2016 ते 28 फेब्रुवारी 2016 च्या दरम्यान दिवसाला एक लाख रुपये दंड आणि त्यानंतर न झाल्यास दिवसाला प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाचे आदेश दिले होते. त्यामुळे फडणवीस यांनी अशा प्रकारचे आदेश कशाच्या आधारावर दिले होते याचे उत्तर द्यावे., असं मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप म्हणाले.

आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे अ‍ॅक्सिस बँकेचे खाते वर्ग करण्याचे आदेश हे आघाडी सरकारच्या काळात देण्यात आले होते. तर माझं त्यांना सांगण आहे हे खरं आहे की, 2005 साली आघाडी सरकार असताना 16 बँकांमध्ये पोलिसांची खाती वर्ग करण्यासंदर्भात निर्णय झाला होता. परंतु निर्णय आमच्या काळात झाला. मात्र अंमलबजावणी हे 2016 साली झाली. ज्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होतं. धक्कादायक बाब अशी, आम्ही ज्या वेळेस निर्णय केला होता. त्यावेळी 16 बँकेचे पर्याय दिले होते. 2016साली जो निर्णय झाला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली त्यावेळी 16 बँकेचा पर्याय नव्हता. त्यावेळी केवळ अ‍ॅक्सिस बँकेमध्ये खाती वर्ग करण्यात आली होती. माझा सवाल तोच आहे केवळ अ‍ॅक्सिस बँक का? इतर बँका का नाहीत? आणि दुसरा सवाल असा ही खाती कशाच्या आधारावर वर्ग केली?, असे सवालही भाई जगताप यांनी उपस्थित केले आहेत.

भाई जगताप म्हणाले, आज नाना पटोले यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये मागणी केली की, फडणवीस सरकार असताना राज्यामध्ये आरएसएसच्या लोकांना किती वाटा मिळायचा याची चौकशी व्हायला हवी. यासाठी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेणार आहेत. आणि चौकशीची मागणी करणार आहेत. माझा या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे. कारण फडणवीस यांच्या काळात जे काही घोटाळे झाले, त्या घोटाळेबाजांना देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली होती. त्यावेळी झालेला चिक्की घोटाळा, सिडको घोटाळा यामध्ये दोन हजार 700 कोटी रुपयांची जमीन ही केवळ 3 कोटीला विकण्यात आली होती. आणि या व्यवहारात जे दलाल होते ते आता भाजपचे आमदार आहेत. याची चौकशी ते करणार आहेत का? यामध्ये आरएसएसला किती वाटा देण्यात आला होता. हे देखील समोर यायला हवं. आज भाजपने राज्यपालांची भेट घेतली हे माध्यमांमधून पाहिलं. राजभवन हे सध्या भाजपचा अड्डा झाला आहे. यामुळे राज्यपाल पदाचं पावित्र्य हे सध्याच्या राज्यपालांनी घालवलं आहे. किंबहुना कलंकित केला आहे असं मला वाटतं.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटले होते, ‘ए भाई, तू जो कोण असशील, माझ्या वर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही युटीआय बँक/अ‍ॅक्सिस बँक ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणार्‍या माणसांना डिवसायचे न्हाय! असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख केला होता.

दरम्यान, वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणी विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारच्या विरोधात रान उठवलं असून, त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असतानाच भाई जगताप यांनी या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना त्यांनी पोलीसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली? याचे उत्तर त्यांनी द्यावं. फडणवीस यांनी तब्बल 21 जणांना त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे त्यांच्या बाबत काय बोलणार असेही देखील भाई जगताप म्हणाले होते. भाजपने परमबीर सिंग यांच्या माध्यमातून लेटर बॉम्ब टाकून झाला. याबाबत मोठ्या प्रमाणात बोंबा बोंब करून देखील झाली.परंतु, त्यांचे सर्व पर्याय निष्क्रिय होत असल्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत ते मागणी करत आहेत. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ व्यवस्थितरित्या पूर्ण करेल असा दावा जगताप यांनी केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या