Wednesday, May 8, 2024
Homeनगरभगवतीपूरमध्ये एकाच वस्तीवरील 7 जण करोना पॉझिटिव्ह

भगवतीपूरमध्ये एकाच वस्तीवरील 7 जण करोना पॉझिटिव्ह

कोल्हार|वार्ताहर|Kolhar

भगवतीपूर येथे एका वस्तीवरील 99 वर्षीय वृद्ध गुरुवारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील 5 जण शुक्रवारी करोनाबाधित आढळले. काल शनिवारी प्राप्त अहवालानुसार त्याच कुटुंबातील आणखी दोघेजण आणि त्यांना खेटून असलेल्या शेजारच्या वस्तीवरील एकाच कुटुंबातील 4 जण त्याचबरोबर नजीक राहणारा 1 व्यक्ती असे एकूण 7 जण शनिवारी करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वस्तीवरील ‘तो’ कंटेन्मेंट झोन एरिया आता हॉटस्पॉट बनल्याची माहिती कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप यांनी दिली.

- Advertisement -

सद्यस्थितीत भगवतीपूरमध्ये एकाच कुटुंबातील 8 व्यक्ती आणि दुसर्‍या कुटुंबातील 4 व आणखी 1 मिळून एकूण 13 जण करोना संक्रमित झाले. हे सर्व करोनाबाधित वस्तीवर शेजारीच वास्तव्यास आहेत व हा परिसर गुरुवारी प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करून सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.

या अनुषंगाने करोनाबधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या आणखी 14 जणांना काल शनिवारी शिर्डी येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये करोना चाचणीकरिता पाठविण्यात आले. गुरुवारी आणि शुक्रवारी करोना चाचणीकरिता पाठविण्यात आलेल्या उर्वरित व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आता काल शनिवारी चाचणीसाठी पाठविलेल्या 14 व्यक्तींचे अहवाल काय येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याखेरीज 9 व्यक्तींनी खाजगीरित्या नगर येथे करोना चाचणी केल्या असून त्यांचे अहवाल येणे शिल्लक आहे.

भगवतीपूरमधील गेल्या 3 दिवसांत दिवसागणिक वाढती रुग्णसंख्या प्रशासनाच्या दृष्टीकोनातून चिंतेची बाब आहे. अद्यापि गावात लॉकडाऊन करण्यात आलेला नसला तरी संबंधित वस्तीवरील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

वस्ती विभागातील लोकांनी करोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन खबरदारी बाळगण्याची गरज आहे. प्रामुख्याने एकाच कुटुंबातील व्यक्ती करोना पॉझिटिव्ह होत असल्याने या खबरदारीच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचे निर्देशित होत असल्याचे डॉ. घोलप यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या