Friday, April 26, 2024
Homeनगरभगवतीमाता सोसायटीत भगवतीमाता शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व

भगवतीमाता सोसायटीत भगवतीमाता शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

भगवतीपूर येथील भगवतीमाता विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे विश्वस्त प्रभाकर उर्फ बाळासाहेब दामोदर खर्डे यांच्या नेतृत्वाखालील भगवतीमाता शेतकरी विकास मंडळाने दणदणीत विजय संपादित केला.

- Advertisement -

भगवतीमाता सोसायटीच्या निवडणुकीत यंदा अत्यंत अटीतटीची दुरंगी लढत पाहायला मिळाली. संस्थेच्या 13 जागांपैकी एका जागेवर बिनविरोध निवड झाली. उर्वरित 12 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 10 जागा भगवतीमाता शेतकरी विकास मंडळाने जिंकल्या. तर विरोधी गट असलेल्या विकास मंडळाला 2 जागांवर समाधान मानावे लागले. भगवतीमाता शेतकरी विकास मंडळाकडे विजयश्री खेचून आणण्यामध्ये नानासाहेब दगडू कडसकर, कुणाल दशरथ गायकवाड व संजय नानासाहेब दळे यांनी मोलाची भूमिका बजावल्याचे प्रभाकर खर्डे यांनी सांगितले.

संस्थेची सभासद संख्या 278 असून त्यापैकी 247 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मतमोजणी प्रक्रिया पार पडली. प्रभाकर दामोधर खर्डे हे सर्वाधिक मतांनी निवडून आले. सुनील भास्कर वारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सदर निवडणुकीत भगवतीमाता शेतकरी विकास मंडळाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- प्रभाकर दामोदर खर्डे, नानासाहेब राजाराम पन्हाळकर, नानासाहेब दगडू कडसकर, बाळकृष्ण ज्ञानदेव खर्डे, प्रशांत नानासाहेब कडसकर, भाऊसाहेब मुरलीधर खर्डे, बाबू नाथा आंबडकर, चित्रा राजेंद्र कडसकर, मनीषा नानासाहेब डोंगरे, सोन्याबापू तुकाराम दळवी.

तर विकास मंडळाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे – सुनील मारुती खांदे आणि राजेंद्र बाळकृष्ण खर्डे. आर. एम. खेडकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना सचिव रवींद्र गागरे यांनी सहकार्य केले.

भगवतीमाता सोसायटीची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. मात्र ही निवडणूक सभासदांनी हातात घेतली होती. सभासदांनी आमच्या आत्तापर्यंतच्या कामाची पार्श्वभूमी लक्षात घेत संस्थेच्या व सभासदांच्या हिताकरिता भगवतीमाता शेतकरी विकास मंडळाच्या बाजूने भरभरून कौल दिला. त्यांनी दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. हा विजय सभासदांच्या चरणी समर्पित करतो.

– प्रभाकर उर्फ बाळासाहेब खर्डे, भगवतीमाता शेतकरी विकास मंडळ

- Advertisment -

ताज्या बातम्या