Saturday, May 11, 2024
Homeनगरभगवानगड प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस मंजुरी

भगवानगड प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस मंजुरी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील पूर्व भागातील जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची अत्यंत जिव्हाळ्याची व सर्वाधिक चर्चेत असलेली बहुप्रतिक्षीत भगवानगड परिसर व 46 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या 190 कोटी 88 लाख रुपयांच्या कामास महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

- Advertisement -

तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेच्या जिव्हाळ्याची बहुप्रतिक्षित भगवानगड परिसर व 46 गावे योजनेस शासन निर्णय 27 एप्रिल 2022 नुसार प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या योजनेसाठी जलजीवन मिशन अंतर्गत केंद्र सरकार व राज्य सरकार प्रत्येकी 50-50 टक्के निधी देणार आहे. पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील पूर्व भाग हा सातत्याने अवर्षण ग्रस्त असून या परिसरातील गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टँकरवर अवंलबून राहावे लागत होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आ. राजळे यांच्याकडे शाश्वत पाणीपुरवठा योजना जायकवाडी जलाशयातून मंजुरी करावी यासाठी मागणी केली होती.

कार्यकर्त्यांची मागणी व पिण्याच्या पाण्याची वस्तुस्थिती पाहता माजी आमदार स्व. राजीवजी राजळे यांनी भगवानगड व परिसरातील गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वेक्षण व डीपीआर तयार करणेसाठी शासनाकडे व पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा सुरू केला. आ. मोनिका राजळे यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन सर्वेक्षण व डीपीआर तयार करून घेऊन भगवानगड परिसर व 46 गावे ग्रामीण नळपाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली. जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत या योजनेतील नवीन निकषानुसार दरडोई 55 लीटर क्षमतेने पाणी देणार्‍या या योजनेची अंदाजपत्रकीय किंमत 190 कोटी 88 लक्ष रुपये इतक्या किमतीच्या अंदापत्रकास व आराखड्यास प्रशासकीय मान्यता 27 एप्रील 2022 रोजी देण्यात आली.

या योजनेसाठी आ. राजळे यांनी दोन वर्षापासून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व आर्थिक तरतुदीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मंत्री गुलाबराव पाटील व संबंधित अधिकार्‍याच्या समवेत बैठका घेऊन आढावा व पाठपुरावा केला. पाथर्डी तालुक्याच्या भगवानगड परिसर या पूर्व भागातील लोकांच्यादृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या असणार्‍या या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळून आ. राजळे यांच्या प्रयत्नाना यश आले. या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आ. राजळे यांनी योजना मंजुरीसाठी सहकार्य केलेल्या सर्व मंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत. तसेच बहुप्रतिक्षीत पिण्याच्या पाण्याची योजना सतत पाठपुरावा करून मंजुरी मिळविल्याबद्दल भगवानगड परिसरातील जनतेने आ.राजळे यांच्या कामाचे कौतुक करून आभार मानले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या