Thursday, April 25, 2024
Homeनाशिकभगूर-नानेगाव रस्ता खुला करणार

भगूर-नानेगाव रस्ता खुला करणार

दे. कॅम्प । वार्ताहर

भगूर ते नानेगाव ( Bhagur – Nanegaon Road )या दरम्यानचा पारंपारिक रस्ता लष्करी हद्दीतून जात असून तो बंद करण्याचा घाट घातला जात असल्याने शेतकरी व नागरिकांना आपल्या शेत व घरापर्यंत जाण्यास अडचणी येत आहे.

- Advertisement -

त्यामुळे काल शिवसेना उपनेते बबनराव घोलप (Shiv Sena Leader Babanrao Gholap ) व जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली असता मामलेदार अ‍ॅक्टच्या माध्यमातून हा रस्ता पूर्ववत करण्याचे आश्वासन देत, तहसीलदारांना कार्यवाही करणेबाबत सूचित केले आहे. त्यामुळे नानेगावकरांचा रस्त्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

भगूर गावाच्या सात बारा उतार्‍यावर असलेल्या परंतु देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील लष्करी आस्थापनाचा ताबा असलेल्या विजय नगर परिसरातील नानेगावकडे जाणारा पारंपरिक रस्ता लष्करी विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्याचा घाट घालत रेल्वे लाईन लागत भिंती बांधण्याचे काम सुरू केले आहे.

काल शिवसेना उपनेते बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे ( Collector Suraj Mandhare )यांची भेट घेत शंभर वर्षांपूर्वीचे नकाशे सादर केले.

भगूर शिवारातून नानेगावकडे जाणारा रस्ता हा पारंपारिक आहे. लष्करासाठी ग्रामस्थांनी जमिनी दिलेल्या आहेत. मात्र आज त्यांनाच त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही, ही बाब जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मामलेदार अ‍ॅक्टच्या माध्यमातून पारंपारिक रस्ते बंद न करता सुरूच ठेवले जातील असे आश्वासन देताना त्यांनी तहसीलदार अनिल दौंड यांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. शिष्टमंडळात माजी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, प्रमोद आडके, संजय अडके, वासुदेव पोरजे, राजाराम शिंदे आदींचा समावेश होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या