बेलवंडी ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय घमासान रंगणार

jalgaon-digital
2 Min Read

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

काष्टी आणि बेलवंडी या राजकीयदृष्टीने महत्वाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवार (दि.28) सुरुवात झाली आहे. मागील निवडणुकीत सरपंच विरोधी गटाचा झाल्याने गाव विकासाच्या नावाखाली भकास झाले असून 10 वर्षे गावचा विकास मागे गेला असल्याची टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी बेलवंडी येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना केली.

दोन दिवसांपूर्वी शेलार यांच्या समर्थकांनी किरण इथापे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळावा घेतला होता. यावेळी बोलताना शेलार म्हणाले, मी 5 वर्षे ग्रामपंचायतमध्ये काय चाललंय हे पहिले नाही. विरोधी गटाचा सरपंच केल्याने गावचे किती नुकसान झाले हे सगळ्यांनी बघितले आहे. सरपंच हा स्वतःचा मनाचा कारभार करणारा नसावा, तर जनतेची कामे करणारा असावा, असा सरपंच उद्याच्या काळात निवडून देऊ त्यामुळे गावाला वेगळी दिशा देऊ. 670 लाभार्थ्यांचे नाव घरकुले यादीतून काढून टाकण्याचे काम विरोधी गटाने असून हक्काच्या घरापासून त्यांना वंचित ठेवले.

मागील 5 वर्षांत गावातील रस्त्यांची कामे निकृष्ट झाली, शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम निकृष्ट पद्धतीने चालूं आहे. कमी ग्रेडचे सिमेंट आणि निकृष्ट कच त्यामध्ये वापरली जात आहे. बांधकामावर पाणी मारले जात नाही. त्यामुळे 2 कोटीच्या कॉम्प्लेक्सची गुणवत्ता ढासळली आहे. या सर्व कामाची चौकशी केली तर यांना तुरुंगात जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मागील चूका सर्वांनी सुधारून आता गाव राज्यात एक नंबर करण्यासाठी जनतेच्या मनातील सरपंच आपण देणार आहे त्यासाठी सर्व उमेदवार आणि सरपंच विजयी होतील असा विश्वास अण्णासाहेब शेलार यांनी बोलताना व्यक्त केला. यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक सुभाष काळाने, उपसरपंच उत्तम डाके, ऋषिकेश शेलार, सलीम शेख, एकनाथ पवार, गणेश हिरवे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संदीप तरटे यांनी केले. प्रास्ताविक मुरलीधर ढवळे यांनी केले तर आभार नामदेव साळवे यांनी मानले.

मागील निवडणुकीत पाचपुते समर्थक सरपंच जनतेतून निवडुन आले. यावेळी ही पाचपुतेचे समर्थक दिलीपराव रासकर शेलार काय भूमिका घेणार, त्याचबरोबर नागवडे आणि आण्णा शेलार यांनी एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आता पाचपुते समर्थकाची भूमिका आणि नागवडेचा विरोध सहन करतांना शेलार कोणती रणनीती अवलंब करतात याकडे लक्ष आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *