Friday, April 26, 2024
Homeनगरबेलपिंपळगावची वाटचाल दारू-जुगार मुक्तीकडे...

बेलपिंपळगावची वाटचाल दारू-जुगार मुक्तीकडे…

बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimpalgav

बेलपिंपळगाव ग्रामपंचायत, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व इतर ग्रामस्थ यांनी गाव दारू, मटका व जुगार मुक्त करण्याचा निर्णय तीन आठवड्यांपूर्वी घेतला आहे. आतापर्यंत यास गावातील तरुणांसह सर्वांचा प्रतिसाद लाभला असून गाव दारू व जुगार मुक्तीकडे वाटचाल करू लागले आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषद गटाचे मुख्य गाव तसेच कायम धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणारं, राजकारणात पुढं असलेलं त्याचबरोबर अवैध व्यवसायांतही आघाडीवर असलेलं अशी गावाची ओळख होऊ लागली होती. गावातील शेकडो तरुण व्यसनाधीन झाले आणि जिल्ह्यातील दुसरे ‘पांगरमल’ होण्याच्या मार्गावर होते. गावातील अनेक कुटुंब हे व्यसनाधीन झाले. गावात दारू पिऊन रोज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत यांचा गावात धिंगाणा, मटका दुकानात तरुणांपासून वयोवृद्ध यांची गर्दी आणि जुगार पत्ते खेळाला तर जागा उपलब्ध नसे.

पण बेलपिंपळगाव ग्रामपंचायत, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व इतर ग्रामस्थ यांनी मिळून निर्णय घेतला की आपलं गाव दारू, मटका, पत्ते, जुगारमुक्त करायचं आणि ते सत्यात आलं. गेली 20 ते 25 दिवस झाले. गावात हे धंदे बंद असून भविष्यात देखील सुरू होणार नाही असे सांगितले. यासंदर्भात नेवासा पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे. गावातील दारू बंद झाली याचा जास्त आनंद गावातील दारू पिऊन पडणार्‍या तरुणांच्या आई व पत्नींना झाला. ग्रामपंचायतीने योग्य निर्णय घेतल्याबद्दल त्यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे.

बेलपिंपळगाव हे धार्मिक, राजकिय, पौराणिक, आणि मोठं गाव पण तरुण पिढी व्यसनाधीन होताना दिसून आली आणि हा निर्णय घेतला. अनेकांनी नावं ठेवली पण गावाच्या कल्याणासाठी निर्धारानं निर्णय अंमलात येत असून सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे.

– चंद्रशेखर गटकळ सरपंच पती, बेलपिंपळगाव

गावात अवैध दारू, मटका, पत्ते, जुगार यांचा अतिरेक झाला होता. अनेकांच्या कुटुंबाचं वाटोळं झालं पण यापुढं गावात कुठल्याही प्रकारचे दोन नंबर धंदे सुरू होणार नाही आणि झाले तर त्यांच्यावर रितसर कारवाई करण्यात येणार आहे

– संजय साठे पोलीस पाटील, बेलपिंपळगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या