Friday, May 10, 2024
Homeनगरअपहरण झालेल्या 'त्या' व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला

अपहरण झालेल्या ‘त्या’ व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला

बेलापूर | वार्ताहर| Belapur

गेल्या सोमवारी अपहरण झालेले बेलापूरचे प्रतिथयश व्यापारी गौतम बाबुलाल हिरण(वय-49) यांचा

- Advertisement -

मृतदेह काल सकाळी सातव्या दिवशी कुजलेल्या अवस्थेत राहाता तालुक्यातील वाकडी-धनगरवाडी शिवारात एमआयडीसीच्या पुढे यशवंतबाबा चौकीजवळ सकाळी आढळून आला. त्यावरून त्यांची हत्या करणे हाच अपहरणकर्त्या गुन्हेगारांचा उद्देश होता, हे सिध्द झाले आहे.

या घटनेची माहिती कळताच बेलापूर-श्रीरामपूर येथील व्यापारी व नागरिक संतप्त झाले असून घटनेच्या निषेधार्थ त्यांनी बेलापूर-बेलापूर खुर्द आणि श्रीरामपूर येथे स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. त्यामुळे या घटनेच्या मुळाशी जाऊन गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ, चुलते असा परिवार आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे खळबळ उडाली असून त्यांची हत्या अपहरणाच्या दिवशीच झाली असावी? अशी शक्यता आहे.

या प्रकरणाचा घटनाक्रम पाहता गुन्हेगार हे स्थानिक असावेत. तसेच त्यांचे सिनेस्टाईलने अपहरण करुन हत्या करण्यामागे नेमके काय कारण असावे? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बेलापूरचे ग्रामस्थ, तालुक्यासह जिल्ह्यातील व्यापारी यांनी तीव्र संताप व्यक्त करुन गुन्हेगारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास व अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका ग्रामस्थ व व्यापारी यांच्यावतीने सरपंच महेंद्र साळवी व सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी घेतली होती. मात्र नंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तातडीने श्रीरामपूरला भेट देऊन अधिकार्‍यांशी चर्चा केली आणि गुन्हेगारांचा शोध घेण्याबाबत मागणी केली.

तसेच काही संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, शहर पोलीस निरीक्षक वसंत सानप, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी पथक उपस्थित होते.

काल सकाळी दहा वाजेच्या दरम्यान मयत व्यापारी गौतम हिरण यांचे चुलते व बेलापूर किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण यांना पोलिसांनी फोन करुन मृतदेह सापडल्याची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी जाऊन त्यांना ओळख पटली. ओळख पटू नये म्हणुन गुन्हेगारांनी चेहरा विद्रुप केला होता. त्यांना लोखंडी सळई, धारदार हत्याराने अतिशय क्रुर पध्दतीने मारहाण केली आहे. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हत्या करुन त्यांचा मृतदेह कुठेतरी दडवून ठेवला असावा. नंतर तो मृतदेह काल रात्री वाकडी शिवारात आणून टाकला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

आपल्या व्यवसायाद्वारे गौतम यांनी तीस कुटुंबांना रोजगार दिला होता. शिवाय सुख-दुःखात त्यांच्यासाठी नेहमी धाऊन जात असत. नोकरांना त्यांनी नेहमी पारिवारिक वागणूक दिली. लॉकडाऊनच्या बंद काळात उपासमार होऊ नये म्हणून त्यांनी सर्व परिवारांची काळजी घेऊन मदत करीत कर्तव्यभान जोपासल्याचे सांगुन कामगारांनी हळहळ व्यक्त केली.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जनतेची नाराजी

घटनेच्या नंतर सात दिवस उलटल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागले नाहीत. थेट विधिमंडळाच्या सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आवाज उठसुठ पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत संताप व्यक्त केल्याने ही घटना राज्यभर पोहोचली. याप्रकरणी पोलिसांच्या धिम्यागतीने हालचाली केल्याने जनतेत मोठी नाराजी आहे.

काही संशयित ताब्यात – एसपी पाटील

बेलापूर ग्रामस्थांसह श्रीरामपूर व बेलापुरातील व्यापारी व अनेक पदाधिकार्‍यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी पाटील म्हणाले, आम्ही काही संशयिताना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत तपास पूर्ण झाल्याशिवाय सर्व गोष्टी बोलता येणार नाही, की जेणेकरून त्याचा फायदा आरोपींना होईल. मात्र सदर घटना ही खंडणीचा प्रकार नाही. त्यामुळे इतर व्यापार्‍यांनी घाबरून जाऊ नये. हा प्रकार वेगळा असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहचेल असे कृत्य कोणीही करू नये. पोलीस गेल्या सात दिवसांपासून रात्रंदिवस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. तपासात कोणी दोषी आढळले तर त्यांची गय केली जाणार नाही.

फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत औरंगाबादला शवविच्छेदन

मृत गौतम हिरण यांचा मृतदेह मिळताच नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाने वाकडी शिवारास भेट दिली. फोरेन्सिक पथकाने मृतदेह तज्ज्ञांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.

हिरण प्रकरणी फडणवीसांनी घेतले अपडेट

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल या घटनेबाबत भाजपाचे प्रकाश चित्ते यांच्याकडून अपडेट घेतले. अपहरण झालेल्या त्या व्यापार्‍याचा मृतदेह सापडला आहे. मृतदेह छिन्नविछीन्न स्थितीत आढळून आला असून पोलीस या तपासकामी अपयशी ठरले आहेत. आपण विधानसभेत याप्रकरणी प्रश्न मांडल्यानंतर काहीप्रमाणात पोलिसांनी तपासात लक्ष घातले होते. मात्र त्यानंतर काही तासातच मृतदेह आढळला असल्याचे चित्ते यांनी सांगितले. त्यावर फडणवीस यांनी याबाबत दुःख व्यक्त केले.

बेलापूर-श्रीरामपूरच्या व्यापार्‍यांनी काल बंद पाळला

घटनेच्या निषेधार्थ शनिवारी बेलापूर बुद्रुक व बेलापूर खुर्द ही दोन्ही गावे बंद ठेवण्यात आली होती. आणि काल हिरण यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यावर दोन्ही गावांसह श्रीरामपूर शहरातील व्यापार्‍यांनी व्यवहार बंद ठेवले होते. आठवडे बाजारात व्यापार्‍यांनी थाटलेली दुकाने आवरून घेत कडकडीत बंदमध्ये सहभाग घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या