Thursday, April 25, 2024
Homeनगरबेलापूर परळी रेल्वे मार्गाला केंद्राच्या मंजुरीसाठी खा. लोखंडे यांनी लक्ष घालावे

बेलापूर परळी रेल्वे मार्गाला केंद्राच्या मंजुरीसाठी खा. लोखंडे यांनी लक्ष घालावे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

बेलापूर-परळी रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी घेण्याची जबाबदारी माझी, असे 2019 मध्ये दिलेल्या आश्वासनाचा शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिव लोखंडे यांना विसर पडला आहे. येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये होणार्‍या बजेटमध्ये खा. लोखंडे यांनी या प्रश्नात लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर नेवासा शेवगाव गेवराई माजलगाव परळी या रेल्वे मार्गासाठी नेवाशाचे तत्कालीन आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाचा 50 टक्के सहभागाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. तेव्हा खा. लोखंडे यांनी केंद्राची मंजुरी घेण्याची जबाबदारी स्वीकारत आश्वासन दिले होते. या आश्वासनाला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन वर्षात या रेल्वे मार्गाच्या मंजुरी साठी त्यांनी कुठलेच प्रयत्न केलेले दिसून येत नाही. या रेल्वे मार्गासाठी कुकाणा परिसरातील नागरिकांनी उपोषणे, आत्मदहने अशी आंदोलने केली. तेव्हाही खा. लोखंडे यांनी या मार्गाला मंजुरी कशी मिळवता येईल, याऐवजी भाजपवाले आमचं ऐकत नाही, असे उत्तर दिले.

त्यावेळी भाजपवाले ऐकत नव्हते परंतु गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. आता कोठे माशी शिंकली. खा. लोखंडे यांची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडे अशी झाली आहे. या रेल्वे मार्गचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण अहवाल 2018 पासून रेल्वे बोर्डाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. हे सर्व असताना मंजुरीसाठी काय अडचण आहे, ह प्रश्न अनुत्तारित आहे.

नगर परळी मार्ग पूर्णत्वाकडे आहे. नव्याने होऊ घातलेली औरंगाबाद पुणे या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्णत्वाकडे आहे. मग बेलापूर परळीसाठी काय अडचण आहे. हे सर्व होत असताना खा. लोखंडे दिल्लीत काय करतात, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये होणार्‍या बजेटमध्ये खा. लोखंडे बेलापूर परळी रेल्वे मार्गाला मंजुरी घेतील का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे

खासदारकीच्या काळात बेलापूर परळी रेल्वे मार्गाचा विषय लोकसभेच्या पटलावार घेऊन सर्वेक्षणास मंजुरी घेतली येणार्‍या अधिवेशनापूर्वी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे तसेच रेल्वे सेवा संस्थेला घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना भेटून ह विषय निकाली काढणार आहे.

– भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार, शिर्डी

राज्याची मंजुरी घ्या, केंद्राची जबाबदारी माझी राज्य शासनाची मंजुरी घेऊन 3 वर्ष झाली अद्याप पर्यंत केंद्राची मंजुरी घेण्यात खा. लोखंडे असमर्थ दिसत आहेत.

– रितेश भंडारी, सचिव बेलापूर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्था

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मदतीने बेलापूर परळी रेल्वे मार्ग मंजूर करून घेऊ

– बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार, नेवासा

- Advertisment -

ताज्या बातम्या