Friday, April 26, 2024
Homeनगरबेलापूर ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण करणे भोवले

बेलापूर ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण करणे भोवले

बेलापूर |वार्ताहर| Belapur

बेलापूर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांना धक्काबुक्की करून दमदाटी केल्याप्रकरणी गायकवाडवस्ती येथील सोमा दुशिंग, हर्षदा दुशिंग, कांचन दुशिंग व रेखा दुशिंग या चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, गायकवाडवस्ती येथे बेलापूर ग्रामपंचायतीची मिळकत नं. 1304 मध्ये 50 बाय 50 मिटर जागा असून त्या जागेत ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी, विहिर, अंगणवाडी, समाजमंदीर व पाच गाळे आहेत. बेलापूर-श्रीरामपूर रस्ता रुंदीकरणाचे काम जोरात सुरू असून रस्त्यावरील आतिक्रमणे तातडीने हटविण्यात आली. त्यात दुशिंग यांचेही अतिक्रमण होते. त्यांचे रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतीच्या जागेत अँगल गाडले. ही बाब सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांच्या लक्षात येताच त्यांनी रेखा फकीरा दुशिंग यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तुम्ही काहीही करा, मी अतिक्रमण करणारच, असे ठणकावून सांगितले. तसेच माझे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तर मी आत्महत्या करून ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करील, अशी धमकी दिली.

त्यानंतर सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या सुचनेवरून ग्रामपंचायत कर्मचारी सचिन साळुंके, सचिन नगरकर, किशोर झीने यांना गायकवाडवस्ती येथील अतिक्रमण केलेल्या ठिकाणी पाठवून अतिक्रमण न करणे बाबत नोटीस देण्यास गेले असता त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांंनी ती नोटीस घरावर डकविली.

अतिक्रमणधारक महिलेच्या मुलीचे शोलेस्टाईल आंदोलन

त्याचवेळी रेखा दुशिंग यांची मुलगी हर्षदा दुशिंग हिने जवळच असलेल्या ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले. आमचे अतीक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तर टाकीवरून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. अखेर त्या मुलीची समजूत काढून तीला खाली सुखरुप उतरविण्यात आले. सोमा दुशिंग याने सरपंच महेंद्र साळवी यांना तलवारीने काटा काढील, तसेच कुणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. तसेच ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. त्यात त्यांना मुका मार लागला.

सरपंच साळवी, उपसरपंच खंडागळे व ग्रामविकास अधिकारी तगरे यांनी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या कानावर हा प्रकार घातला. दुशिंग परिवाराला समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुशिंग परीवाराने तेथेही दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. ग्रामविकास आधिकारी राजेश तगरे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला भादंवि कलम 353, 332, 309, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या