Thursday, April 25, 2024
Homeनगरबेलापूर बदगी लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो, ग्रामस्थांकडून जलपूजन

बेलापूर बदगी लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो, ग्रामस्थांकडून जलपूजन

ब्राम्हणवाडा |वार्ताहर| Bramhanwada

अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात मागील व चालू आठवड्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने एकूण 94.58 दशलक्ष घनफूट क्षमतेचा हा माती साठवण तलाव शुक्रवारी ( दि.21 ) भरून वाहू लागला असून काल शनिवारी (दि.22) सरपंच जालिंदर फापाळे व ग्रामस्थांनी जलपूजन केले. जलपूजन केल्यानंतर सरपंचांनी ग्रामस्थांना पेढे वाटून आनंद साजरा केला.

- Advertisement -

यावेळी सरपंचांसह शिवाजी फापाळे, बाबाजी फापाळे, भिमानाना फापाळे, पोलीस पाटील केशव त्रिभुवन, बाळासाहेब फापाळे, आप्पाजी फापाळे, प्रकाश फापाळे, के. डी. घबाडे, रामदास हांडे, बाळासाहेब फापाळे, रमेश पवार, हौशीराम गोपाळे, जयराम फापाळे, राजू कुर्‍हाडे, दिनकर फापाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा तलाव भरल्यामुळे कोटमारा धरणात नवीन पाण्याची आवक झपाट्याने सुरू झाली आहे. या पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील ब्राह्मणवाडा, जांभळे, काळेवाडी, बदगी तसेच लाभक्षेत्रातील बेलापूर, चैतन्यपूर, जाचकवाडी येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. माती साठवण तलाव या प्रकारात मोडणार्‍या या प्रकल्पाची उंची 19.93 मीटर व लांबी 507.00मीटर आहे. 17.80 चौ. कि.मी.चे पाणलोटक्षेत्र असून 77.85 दशलक्ष घनफूट उपयुक्त साठा तर 16.13 मृतसाठा आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात देखील हे धरण कोरडे ठाक पडले होते. परिणामी बेलापूर व ब्राह्मणवाडा दोन्ही गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. तलाव भरल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या