Friday, April 26, 2024
Homeनगरमारहाण प्रकरणी आठ आरोपींना तुरूंगवास

मारहाण प्रकरणी आठ आरोपींना तुरूंगवास

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

निंबोडी (ता. नगर) येथे सन 2015 मध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी दाखल गुन्ह्यातील सर्व आठ आरोपींना एक वर्ष तुरूंगवास व प्रत्येकी एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल ढगे यांनी काम पाहिले.

- Advertisement -

अशोक जगन्नाथ केदारे, ललीता मुकुंद भिंगारदिवे, विवेक मुकुंद भिंगारदिवे, बापु ऊर्फ सुनील अनिल जाधव, कृपाल मुकुंद भिंगारदिवे, आकाश ऊर्फ दादू सुभाष भिंगारदिवे, संदीप बबन भिंगारदिवे, सुनील जगन्नाथ केदारे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

26 ऑक्टोबर 2015 रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास भैरवनाथ बेरड (रा. निंबोडी) हे शेतातून घरी जात होते. त्यावेळी जामखेड रोडवर गणेश मेडिकलसमोर गर्दी व आरडाओरडा चालू होता. ते पाहून भैरवनाथ तेथे गेले. तेव्हा आठ आरोपी नाथा चंद्रकांत बेरड, मिनीनाथ पोपटराव वाघस्कर, जयराम कचरू बेरड यांना शिवीगाळ करून मारहाण करत होते. ते पाहून भैरवनाथ भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना देखील शिवीगाळ मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

जिल्हा रूग्णालय येथे जखमीवर उपचार सुरू असताना आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली होती. भैरवनाथ यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार संजय घोरपडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सर्व आरोपींना न्यायालयाने दोषी धरून एक वर्ष तुरूंगवास व प्रत्येकी एक हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान आरोपी व फिर्यादी एकाच गावातील असल्याने व भविष्यात वाद करणार नाही म्हणून चांगल्या वर्तवणुकीचा बॉण्ड देण्याचा आदेश न्यायालयाने केला. या खटल्यामध्ये पैरवी अधिकारी सहायक फौजदार डी. डी. ठुबे यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या