Friday, April 26, 2024
Homeनाशिकसाथरोगांबाबत दक्षता बाळगा

साथरोगांबाबत दक्षता बाळगा

मालेगाव । प्रतिनिधी

करोना बाधितांच्या संख्येत घट होत असल्याची स्थिती दिलासादायक असली तरी सतर्क राहणे आवश्यक आहे. पावसाळ्यास यंदा लवकरच प्रारंभ होण्याची चिन्हे दिसत असल्याने साथरोगांचा फैलाव होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेसह सर्व विभागांनी सज्ज राहावे जंतूनाशक फवारणी, स्वच्छता अभियानासह रुग्णालयामध्ये पुरेसा औषधांचा साठा तसेच शुध्द पाणीपुरवठा होईल, यासाठी नियोजन करावे, असे आवाहन कृषी मंत्री दादा भुसे यांनी येथे बोलतांना केले.

- Advertisement -

शहरातील सामान्य रुग्णालय, मसगा करोना उपचार केंद्र, सहारा सेंटर व महिला बाल रुग्णालय परिसरात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. भुसे यांनी स्वत: हातात खराटा घेत रुग्णालयात तसेच परिसरात कचर्‍याचे निर्मूलन केले.

या मोहिमेत उपमहापौर नीलेश आहेर, सामान्य रूग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. किशोर डांगे, डॉ. हितेश महाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल पाटील, मनपा उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, वैभव लोंढे, राजू खैरनार, विनोद वाघ, श्रीराम मिस्तरी, राजेश अलिझाड, प्रमोद शुक्ला, राजेश गंगावणे, छाया शेवाळे आदींसह शिवसेना पदाधिकार्‍यांसह डॉक्टर, आरोग्य व मनपा सेवक सहभागी झाले होते.

साथरोग फैलावू नये, तसेच पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने दक्षता बाळगण्याचे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी दिले. शहर व तालुका ग्रामपातळीवर या संदर्भात तातडीने नियोजन करण्यात यावे. औषधांचा पुरेसा साठा आरोग्य यंत्रणांनी उपलब्ध करून घ्यावा. तसेच दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची दक्षता संबंधित विभागाने घेण्याची सूचना भुसे यांनी केली.

यावेळी महिला रुग्णालयातील औषधसाठ्याची पडताळणी करत कृषिमंत्र्यांनी सामान्य रुग्णालयातील ड्रेनेज टाक्यांसह पाईपलाईन व इतर किरकोळ दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले.

पोस्ट करोनानंतर जाणवणारा म्युकरमायकोसीसबाबत भुसे यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा करत उपचाराबाबत आढावा घेतला. नागरिकांनी सार्वजनिक स्थळावर गेल्यास पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थांची पाकिटे, अन्य कचरा जमा करून कचरा कुंडीत टाकावा. तसेच ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून महानगरपालिकेच्या कचरा जमा करणार्‍या गाडीत टाकावा. कोणीही व्यक्ती रस्त्यावर कचरा टाकत असेल वा थुंकत असेल तर त्याला प्रत्येकाने प्रतिबंध केला पाहिजे.

प्रत्येक व्यक्तीला स्वच्छतेची सुरुवात ही स्वत:पासूनच करण्याची जागृती करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचेही भुसे यांनी स्पष्ट केले. यावेळी तालुकाप्रमुख संजय दुसाने, दत्ता चौधरी, राजेश गंगावणे, प्रमोद पाटील, छाया शेवाळे आदींसह स्वच्छता निरीक्षक व सफाई सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या