Thursday, April 25, 2024
Homeधुळेअवघ्या काही तासातच बॅटर्‍या चोरीचा उलगडा, दोघांना अटक

अवघ्या काही तासातच बॅटर्‍या चोरीचा उलगडा, दोघांना अटक

सोनगीर । Songir । वार्ताहर

येथील नॅशनल बॅटरी (National Battery) व इलेक्ट्रीक दुकानातील चोरीचा (Theft) सोनगीर पोलिसांनी (police) अवघ्या काही तासातच उलगडा केला. सापळा रचून धुळ्यात दोघांना अटक (Arrested) करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीच्या सव्वा लाखाच्या बॅटर्‍या व गुन्ह्यात वापरलेली दीड लाखाची कार जप्त करण्यात आली.

- Advertisement -

सोनगीर फाट्यावर शहबाजखान अलताफखान (रा.पठाणपुरा, सोनगीर) यांच्या मालकीचे नॅशनल बॅटरी व इलेक्ट्रीक नावाचे दुकान आहे. दि. 30 रोजी रात्री 8 ते दि. 31 रोजी सकाळी 8 वाजेदरम्यान चोरट्यांंनी या दुकानाचे कुलुप तोडुन एकुण विविध कंपनीच्या दोन चाकी व चार चाकी वाहनात उपयोगी पडणार्‍या नव्या व जुन्या अशा एकुण 104 बॅटर्‍या चोरुन नेल्या. त्यांची किंमत 1 लाख 14 हजार 812 रुपये रूपये इतकी आहे. याप्रकरणी शहबाजखान अलताफखान यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सपोनि चंद्रकात पाटील तपासाला गती देत एक पथक तयार केले.

चोरीस गेलेल्या मालाचा हद्दीत शोध घेत असतांना सॅन्ट्रो कारमध्ये (क्र. एमएच 06 एम 8838) चोरीस गेलेल्या बॅटर्‍यांचा माल भरुन तो धुळे शहरात विक्रीसाठी जात असल्याची गुप्त माहिती सपोनि पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धुळे शहरात पारोळा रोडवर सापळा रचुन त्या कारला पकडले. तेव्हा त्यातील इसम हे पळुन जात असतांना त्यांनाही पाठलाग करत पकडण्यात आले. रोहन सुभाष जाधव (वय 23) व सुरज संजय काकडे (वय 19) दोन्ही रा. पवारवाडी, नाशिक रोड अशी दोघांनी त्यांची नावे सांगितले. त्यांच्याकडुन चोरीस गेलेल्या एकुण 1 लाख 14 हजार 812 रुपये किंमतीच्या 104 बॅटर्‍या व गुन्हयात वापरण्यात आलेली दीड लाखाची कार जप्त करण्यात आली. दोघा संशयीत आरोपीतांना अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ फारुक शेख करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, उपनिरीक्षक नामदेव सहारे, पोहेकॉ फारुक शेख, विजय पाटील, संजय देवरे, पोकॉ संजय जाधव, आनंदा पाटील, सुरज साळवे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या