Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याकरांच्या ओझ्यामुळे वाईन उद्योगांची घसरण

करांच्या ओझ्यामुळे वाईन उद्योगांची घसरण

नाशिक । प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय स्तरावर वाईनला मिळणारा सन्मान पाहता देश पातळीवर वाईन कॅपिटल म्हणून नाशिकचा गौरवच होत असल्याची भावना उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षात नाशिकच्या वाईन उद्योगांने अडथळ्याच्या शर्यतीचा सामना केलेला आहे. विंचूर वाईन क्षेत्र आरक्षणा व्यतिरिक्त शासनाकडून फारसे लक्ष दिले गेले नव्हते.आता वाईनला नवी ओळख मिळाल्याने या उद्योगाकडे केंद्र सरकार विशेष लक्ष देणार आहे. त्यामुळे येणार्‍या काळात या उद्योगांना नवी ओळख मिळणार आहे.

- Advertisement -

सध्या देशांतर्गत वाईनला मोठी मागणी आहे. किंबहूना जगाच्या तुलनेत भारत ही मोठी बाजारपेठ आहे. मात्र राज्यांतर्गत कर प्रणालीतील मोठ्या तफावतीमुळे वाईन विक्रीवरही त्याचा विपरित परिणाम दिसत होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर इटली, फ्रान्स यां वाईनमध्ये अग्रेसर असलेल्या देशांच्या करांच्या तुलनेत भारतात करांचे ओझे जास्त आहे. त्यामुळे जागतीक स्तरावरही स्पर्धा करताना गुणवत्ता असतानाही भारतीय वाईन महाग असल्याने मागे पडत आहे. परिणामी निर्यातीवर त्याचा विपरित परिणाम दिसून येेतो.आता केंद्र सरकारनेच शिक्कामोर्तब केल्यामुळे आता वाईन उद्योगाला न्याय देण्यासाठी सहकार्य लाभणार आहे.त्यामुळे भारत सरकारच्या वाईन कॅपिटलमधून जाणार्‍या उत्पादनांना विशेष ओळख मिळणार आहे.

हे होतील फायदे : सध्या देशांतर्गत करप्रणालीत सुसूत्रता येण्याने भारतीय बाजारपेठेत नाशिकची वाईन आपली ओळख निर्माण करील. शासनाच्या माध्यमातून वाईन उत्पादनाला गुणवत्ता व दर्जा निर्माण करण्यासाठी सेवा केंद्र उभे राहु शकेल. त्यासाठी शासनस्तरावरुन अनुदान मिळू शकेल. मागिल 7-8 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वाईन क्लस्टरला केंद्राचाच उपक्रम असल्याने तातडीने मान्यता मिळणे सोपे होणार आहे.

वाईन पार्क, वाईन फेस्टीवलसारख्या उपक्रमांंसाठी सामूहिक सुविधा केंद्र उभारणे गरजेचे होते, ते आता शक्य होणार आहे.द्राक्षांच्या नवनवीन जातींची लागवड करण्यासाठीचे संशोधन, मार्गदर्शन व रोपांची उपलब्धता करणे सोपे होणार आहे. द्रांक्ष मालाचा उठाव वाढणार असल्याने आपोआपच शेतकरी बांधवाच्या उत्पादनांना मागणी वाढणार आहे. परिणामी रोजगाराच्या संधी वाढणार आहे.

राष्ट्रीय पातळीवरुन वाईन प्रमोशन केले जाणार असल्याने आपोआपच वाईन टुरीझमला प्रोत्साहन मिळणार आहे. सामुदायिकरित्या वाईन टुरीझम सुविधा उभारण्यासही प्राधान्य मिळेल.जगाच्या पाठीवर मेक इंन इंडीयाला खर्‍या अर्थाने चालना मिळणार आहे.

देशात वाईन उत्पादनात नाशिक अग्रस्थानावर आहे. नाशिक परिसरात 47 वायनरींची नोंदणी झालेली असून त्यात 17 वायनरी या मोठ्या स्वरुपाच्या आहेत. त्यांच्या माध्यमातून इतर छोट्या उत्पादकांच्या उत्पादनांना देश पातळीवरुन मागणी मिळवून दिली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या