Friday, April 26, 2024
Homeनगरबर्‍हाणपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीस पिंपरी चिंचवड येथे अटक

बर्‍हाणपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीस पिंपरी चिंचवड येथे अटक

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील बर्‍हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्यावर गावठी कट्ट्यातून चार गोळ्या झाडत प्राणघातक हल्ला करुन फरार झालेल्या मुख्य आरोपीस शनिशिंगणापूर पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून रविवारी सकाळी अटक केली आहे. वेषांतर करुन केलेल्या या धाडसी मोहीमेचे कौतुक होत आहे.

- Advertisement -

ग्रामपंचायत सदस्य व किक बॉक्सर खेळाडू संकेत भानुदास चव्हाण (वय-25) यांच्यावर 15 जून रोजी कांगोणी फाट्यानजीक मोटारसायकलवरुन आलेल्या दोन जणांनी गावठी कट्ट्यातून चार फायर केले होते. गंभीर जखमी झाल्याचे पाहून आरोपी लगेचच फरार झाले. या घटनेने परीसर भयभीत झाला होता. तेंव्हापासून शनिशिंगणापुरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल व पथक तसेच गुन्हा अन्वेषणचे पथक आरोपीच्या शोधासाठी कार्यरत होते.

जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, हवालदार ज्ञानेश्वर माळवे, पोलीस नाईक बापू फुलमाळी यांनी एमआयडीसीतील कामगारांचा वेष घेवून पिंपरी चिंचवड येथील खराबवाडी येथे राहत असलेल्या प्रेयसीच्या घरातून मुख्य आरोपी बाळासाहेब भाऊसाहेब हापसे यास रविवारी सकाळी अकरा वाजता अटक केली.

दुसरा आरोपी विजय भारशंकर अजुनही फरार आहे. चव्हाण यांच्यावर गोळीबार केल्यानंतर आरोपी शिंगणापूर, सोनई, राहुरी मार्गे नागापूर एमआयडीसी येथे गेले होते. येथून शिक्रापूर, शेवगाव, पैठण, औरंगाबाद, भिमाशंकर व काही दिवस पुण्यात राहिले.

शिंगणापूर पोलिसांनी चोरपुरी (जि. बीड) येथे मागील आठवड्यात पाठलाग केला मात्र आरोपी उसातून पळून गेले होते.

आरोपींनी मोबाईलचा वापर बंद केल्याने तपासात अडचण येत होती. अखेर गुप्त खबर्‍याकडून मिळालेल्या खबरीनंतर आरोपीस अटक करण्यात आली.

आरोपी हापसे व भारशंकरवर गुन्हा रजिस्टर नंबर 69/2021, भा.द.वि. 307, 34, आर्म अ‍ॅक्ट 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.गोळीबार घटनेचे तीव्र पडसाद नेवासा तालुक्यात उमटले होते. आरोपी अटक होत नसल्याने नाराजीचा सूर होता.सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी पथकासह चाकण पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्‍याची मदत घेवून आरोपीस अटक केली. शनिवारी दिवसभर पोलीस आरोपीच्या मागावर होते. रिक्षातून चाललेल्या प्रेयसीचा व आरोपीचा पायी पाठलाग केला. घरातून पैसे नेण्यास आलेल्या आरोपीस रिक्षातून जाताना पोलिसांनी अटक केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या