Friday, April 26, 2024
Homeनगरसंगमनेरातील चार बँकांना सहा कोटींहून अधिक रुपयांना फसविणारा सराफ फरारच

संगमनेरातील चार बँकांना सहा कोटींहून अधिक रुपयांना फसविणारा सराफ फरारच

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील नामांकित चार बँकांच्या शाखांना सहा कोटींहून अधिक रुपयांना फसविणारा गोल्ड व्हॅल्यूअर अद्यापही फरारच आहे. तो सापडत नसल्याने पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ लागला आहे.

- Advertisement -

संगमनेर शहरातील विविध बँकांमध्ये खोटे दागिने तारण ठेवून सोने तारण कर्ज वितरित केले जात असल्याचे वृत्त सर्वप्रथम दैनिक सार्वमतने दोन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केले होते. शहरातील या सराफाने ही फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. सार्वमतच्या वृत्तानंतर बँकांचे अधिकारी जागे झाले होते. त्यांनी सोन्याची तपासणी केली असता बनावट दागिने तारण ठेवल्याचे निष्पन्न झाले होते. नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक, जी.एस.महानगर बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक व प्रवरा बँक या मोठ्या बँकेमध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. या चार बँकांना तब्बल सहा कोटींहून अधिक रुपयांचा चुना या भामट्याने लावला आहे.

त्याने 196 कर्जप्रकरणांमधून 6 कोटी 10 लाख 12 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर फसवणुकीचे चार गुन्हे दाखल झालेले आहेत.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर इतर तीन बँकाचाही असाच प्रकार झाल्याचे स्पष्ट झाले. नाशिक मर्चंट को- ऑपरेटीव्ह बँकेत त्याने 136 जणांच्या संगनमताने तब्बल 4 कोटी 20 लाख 15 हजार रुपयांचे सोने तारण ठेवून त्या बँकेची फसवणूक केली. जी.एस.महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेत 82 लाख 57 हजार रुपये व प्रवरा सहकारी बँकेतील आठ प्रकरणांमधून 38 लाख 44 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

संगमनेरच्या आर्थिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा उघडकीस होऊनही पोलिसांनी मात्र अद्यापही या प्रकरणाचा गांभीर्याने विचार केलेला नाही. हा सराफ अद्यापही फरारच आहे. पोलिसांनी त्याला अटक न केल्याने याबाबत उलट-सुलट चर्चा होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या