बँक खात्यास आधारकार्ड लिंक करून काढले 6.80 लाख

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विनापरवानगी बँक खात्यास आधारकार्ड लिंक करून खात्यातून सहा लाख 80 हजार रुपये काढून घेत कुंभारवाडी (ता. संगमनेर) येथील शेतकर्‍याची फसवणूक केली आहे. 18 जून, 2022 ते 20 ऑक्टोबर, 2022 दरम्यान ही घटना घडली असून याबाबत संंबंधित शेतकर्‍याने गुरूवार, 3 नोव्हेंबर, 2022 रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सायबर पोलिसांनी फिर्यादी यांच्या खात्यास लिंक असलेल्या आधारकार्ड नंबरवरील अनोळखी इसमाविरूध्द भादंवि कलम 419, 420 सह आयटी अ‍ॅक्ट कलम 66 (डि) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. कुंभारवाडी येथील फिर्यादीचे इंडियन ओव्हरसीज बँकेत खाते आहे. त्यांच्या या खात्यावर रक्कम होती. त्यांनी त्यांच्या बँक खात्याचा कोणताही तपशील इतर कोणालाही दिलेला नव्हता.

तसेच त्यांनी कुठल्याही ओटीपी संबंधी माहिती दिलेली नव्हती. असे असतानाही 18 जून ते 20 ऑक्टोबर दरम्यान अज्ञात इसमाने विनापरवानगी फिर्यादी यांच्या बँक खात्यास एक आधार नंबर लिंक केला. त्याव्दारे फिर्यादी यांच्या खात्यातून त्यांच्या परवानगीशिवाय परस्पर सहा लाख 80 हजार रुपयांची रक्कम काढून घेत त्यांची फसवणूक केली आहे.

आपल्या खात्यातील रक्कम कोणीतरी परस्पर काढून घेतली असल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाल्यानंतर त्यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेतही चौकशी केली. फिर्यादी यांना त्यांची रक्कम न मिळाल्याने त्यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.

खात्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह

फिर्यादी यांचे इंडियन ओव्हरसीज बँकेत खाते आहे. या खात्याला फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय आधार नंबर लिंक झाल्याने खात्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बँकेतून रक्कम काढून घेतल्यानंतरही फिर्यादी यांच्या तक्रारीची दखल घेतली नसावी म्हणून त्यांनी थेट सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सायबर पोलीस यासंदर्भातील सत्यता तपासतील यात शंका नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *