Friday, April 26, 2024
Homeनाशिकबाळासाहेबांची शिवसेना शिष्टमंडळाची पोलीस, मनपा आयुक्तांशी भेट

बाळासाहेबांची शिवसेना शिष्टमंडळाची पोलीस, मनपा आयुक्तांशी भेट

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे (Balasaheb’s Shiv Sena party)सचिव संजय माशीलकर, खा. हेमंत गोडसे, नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख जयंत साठे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची भेट घेत चर्चा केली.

- Advertisement -

यावेळी नाशिक लोकसभा सहसंपर्कप्रमुख काशिनाथ मेंगाळ, ग्रामीण जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे, महिला आघाडी जिल्हा संघटक लक्ष्मी ताठे, मंगला भास्कर, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, महिला आघाडी महानगरप्रमुख अस्मिता देशमाने, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश मस्के, सदानंद नवले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली.

नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याशी झालेल्या चर्चेत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली. कुंभमेळ्याच्या नियोजनसाठी राज्यस्तरीय समिती तयार होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय माशीलकर यांनी दिले. शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे नवे रिंगरोड अधिक रुंदीचे असावे, अशी सूचना खा. हेमंत गोडसे यांनी केली.

शहरातील महापालिकेचे सभागृह विविध संस्था ताब्यात घेऊन देखभाल करण्यास तयार असल्याने त्यांना रेडिरेकनरने भाडे आकरण्याऐवजी सवलत द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्याला मनपा आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालयातील एमआरआय मशीन लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे आयुक्तांनी संगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास विभागाने तीन केडरचा आकृतिबंध मंजूर केल्याने लवकरच मेडिकल, पॅरामेडिकल आणि अग्निशमन विभागात भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ही भरती प्रकिया लवकर राबवण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. त्यामुळे 600 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

स्मार्ट सिटीअंतर्गत दहीपूल ते नेहरू चौकातील रस्ता बांधकाम अयोग्य, अरुंद झाल्याने व्यापारी, नागरिक त्रस्त असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्याबाबत स्वत: लक्ष घालण्याचे आयुक्तांनी आश्वासित केले. नंदिनी नदीला गतवैभव देऊन तिला पुन्हा नंदिनी नदीचे रूप देण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी मांडली. लवकरच नदीची पाहणी करण्याचे आयुक्तांनी आश्वासित केले.

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याशी झालेल्या भेटीत अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करून चुंचाळे, अंबड औद्योगिक वसाहतीच्या स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव, श्रमिकनगर भागातील अवजड वाहतूक, कंटेनर, अपघातग्रस्त रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट, गुन्हेगारी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळात अ‍ॅड. श्रद्धा जोशी-कुलकर्णी, प्रवीण काकड, कोमल साळवे, अ‍ॅड. अक्षय कलंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या