Friday, April 26, 2024
Homeनाशिककृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

2100 कोटींच्या प्रकल्पाला जागतिक बँकेचे 1470 कोटींचे सहाय्य

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

जागतिक बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाचे नामकरण मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प असे करण्यात आले आहे. शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्यव्यवसाय विभागाने याबाबतचे शासकीय परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

राज्य शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राबविण्यास जानेवारी 2019 मध्ये मान्यता दिली होती. या प्रकल्पासाठी 2100 कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून त्यापैकी 1470 कोटी रुपयांचे सहाय्य जागतिक बँकेकडून कर्ज स्वरूपात घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाद्वारे राज्यातील विविध पिकांच्या कार्यक्षम मूल्य साखळ्या विकसित करून त्यात संघटित शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी, शासकीय योजना किंवा प्रकल्पांच्या माध्यमातून यापूर्वी संघटित केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्रक्रिया करून तो थेट खाजगी उद्योजकांना विक्री करण्यासाठी बाजार जोडणी व्यवस्था उभी करण्याचे धोरण शासनाचे आहे.

त्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प या नांवानें स्वतंत्र कंपनी स्थापण्यात आली आहे. या प्रकल्पाला नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हा प्रकल्प यापुढे मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प या नावाने संबोधण्यात येणार आहे. केवळ कार्यालयीन कामकाजासाठी प्रकल्पाचे नाव बदलण्यात आले असून प्रकल्पाचा मूळ उद्देश, व्याप्ती, व संरचनेत कोणताही बदल करण्यात आला नाःई असे शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या